रायगडावरील तीन फुटका तलावांच्या संवर्धन कामाला गती
esakal April 03, 2026 10:45 PM

रायगडावरील तीन फुटका तलावांच्या संवर्धन कामाला गती
महाड, ता. ३ (बातमीदार) : रायगड विकास प्राधिकरणमार्फत रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या व सध्या फुटका तलाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तीन ऐतिहासिक तलावांचे संवर्धन व नुकसानग्रस्त भागांची पुनर्रचना करण्याचे काम वेगाने सुरू आहे. हे सर्व संवर्धन कार्य मूळ शिवकालीन वास्तुरचनेत कोणताही बदल न करता, पारंपरिक पद्धतीने करण्यात येत असून, या संवर्धनामुळे फुटका तलावांचे ऐतिहासिक महत्त्व तसेच जलसंधारणाची क्षमता वाढण्यास मदत होणार आहे.
रायगड किल्ल्यावर बाजारपेठेतून जगदीश्वर मंदिराकडे जाताना उजव्या बाजूस हे तीन तलाव नजरेस पडतात. शिवकाळात रायगडाच्या पाणीसाठ्याच्या दृष्टीने हे तलाव अत्यंत महत्त्वाचे होते. उतारांवर पक्के दगडी बांध घालून हे तलाव निर्माण केले गेले होते. मात्र, कालानुरूप या तलावांची बांधणी कमकुवत होऊन, दगड निखळून बांधाच्या भिंती ढासळल्या होत्या. तसेच, मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने पाणवठे बुजलेले होते. रायगड विकास प्राधिकरणाने या तीनही तलावांच्या संवर्धनाचे काम हाती घेतले असून, या कामांतर्गत बांधकामात उगवलेली झुडपे, गवत यांचे समूळ उच्चाटन करण्यात आले आहे. ढासळलेल्या दगडांचा बांधकामातील मूळ जागांचा अभ्यास करून त्यांची ऐतिहासिक पद्धतीने शास्त्रोक्त पुनर्रचना करण्यात आलेली आहे. प्रत्येकी २०० ते ३०० किलो वजनाचे हे मूळ दगड वापरूनच पारंपरिक पद्धतीने बांधकाम करण्यात आले आहे. या बांधकामाच्या मजबुतीसाठी दोन दगडांमध्ये लोखंडी कलम बसविले आहेत. शिवकालात जसे दिसत होते, तसेच आत्ताही दिसावेत अशा पद्धतीने या तलावांचे संवर्धन करण्यात आलेले आहे.
त्याचबरोबर तलावामध्ये पाणीगळतीच्या ठिकाणांचा शोध घेऊन त्या ठिकाणी पारंपरिक चुन्याचे मिश्रण घालून शास्त्रोक्त पद्धतीने गळती काढण्याचे काम करण्यात आले आहे. पाणवठ्यात साचलेला गाळ काढण्याचेही काम सुरू असून, येणाऱ्या पावसाळ्यात तलाव काही प्रमाणात भरून साठवण क्षमतेची चाचणी घेतली जाणार आहे. नजीकच्या काळात या तलावांचे काम पूर्ण झाल्यानंतर पाणीसाठ्यातदेखील वाढ होणार आहे.
.......
फोटो
१) तलावांचे काम सुरू असताना
२) एका तलावाचे काम पूर्ण झाल्यावर

.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.