Nashik Accident News : नाशिकच्या दिंडोरीमध्ये एक भीषण अपघाताची घटना घडली आहे. यात भरधाव चार चाकी गाडी विहिरीत कोसळल्याची (Accident News) घटना घडलीय. ज्यामध्ये ईरटीका गाडीसह गाडीतील नऊ जण विहिरीत कोसळल्याची (Dindori Accident) माहिती आहे. घटना घडल्यानंतर रात्री उशिरापर्यंत शोध मोहीम सुरू असून या गाडीत तीन ते चार लहान मुले असल्याची देखील माहिती आहे. हा अपघात नेमका कशामुळे झाला हे अद्याप कळू शकलेलं नाही. मात्र रात्री उशिरापर्यंत शोध मोहीम सुरू असताना घटनास्थळावर मोठा जमाव जमला होता. तर या भीषण अपघातात 9 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती आहे. (Nashik Accident News)
Dindori Accident News : एकाच कुटुंबातील 9 जणांचा घटनास्थळीच मृत्यू
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवार (3 एप्रिल २०२६) रात्री दहा वाजेच्या सुमारास दिंडोरी शहरात एक कार क्रमांक MH15-JS-1053 शिवाजी नगर येथे राजू राजे यांच्या विहिरीत कोसळली. या घटनेत 9 जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.दरम्यान अपघातानंतर स्थानिक नागरिक व प्रशासनाकडून बचाव कार्य सुरु करण्यात आले होते. अपघातातील कार क्रेनच्या साहाय्याने विहिरीतून बाहेर काढल्यानंतर कारमध्ये एकूण नऊ जण असल्याची माहिती मिळाली असून कारमधील नऊ जणांचा मृत्यू झाला आहे.
मृतांमध्ये दरगोडे कुटुंबातील सुनील दत्तू दरगोडे, राखी सुनील दरगोडे, उषा अनिल दरगोडे, श्रद्धा अनिल दरगोडे, श्रावणी अनिल दरगोडे अशा एकाच कुटुंबातील पाच सदस्यांचा व इतर 4 नातेवाईक असे एकूण नऊ जण होते. अपघातातील मृत हे सर्वजण दिंडोरी तालुक्यातील इंदोरे गावातील रहिवासी असल्याचे समजते आहे. एका खाजगी क्लासच्या कार्यक्रमावरून परतत असतांना हा अपघात घडला. रात्री उशिरापर्यंत NDRF, प्रशासन व स्थानिक नागरिकांच्या मदतीने बचाव कार्य सुरू होते. मात्र विहिरीत पाणी असल्याने आणि अंधारात दिसत नसल्याने तांत्रिक अडचणी येत होत्या. या भीषण अपघाताने परिसरात एकच खळबळ उडाली असून अपघाता मागील कारण अद्याप कळू शकलेलं नाही.
विद्युत खांबाला अज्ञात भरधाव वाहनानं धडक दिली, यानंतर जिवंत वीज तारा रस्त्यावर कोसळल्या. ही बाब एका वाहन धारकाच्या लक्षात येताच त्यानं रस्त्याच्या दोन्ही बाजूनं येणारी वाहतूक तातडीनं थांबवली. वाहन चालकाच्या प्रसंगावधानानं मोठी जीवितहानी टळली. ही घटना भंडाऱ्याच्या तुमसर इथं पंचायत समितीसमोर रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली. वीज तारा रस्त्यावर कोसळल्यानं दुतर्फा वाहनांच्या प्रचंड रांगा लागल्या होत्या. याची माहिती वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना मिळाल्यानंतर त्यांनी या मार्गावरील विद्युत पुरवठा बंद केला आणि त्यानंतर तारा बाजूला करून खोळंबलेली वाहतूक सुरळीत केली.
इतर महत्वाच्या बातम्या