तिला मुक्त व्हायचंय! : सावर रे मना...
esakal April 04, 2026 09:45 AM

डॉ. मृदुला आपटे, क्लिनिकल सायकोलॉजिस्ट

मी ना पहिल्यांदा ऋताकडे समुपदेशनासाठी आली होती, तेव्हा तिच्या हातापायांत वेदना होत होत्या. पण तिचे वैद्यकीय चाचण्यांचे अहवाल सामान्य होते. डॉक्टरांना मीनाच्या दुखण्यामागे कुठलेच वैद्यकीय कारण सापडत नव्हते. पण मानसिक स्वास्थ्यासाठीच्या समुपदेशनासाठी ‘केस हिस्ट्री’ घेताना, मीनाला व्यक्ती म्हणून समजून घेताना ऋताला समजले, की मीना मनातून खूप खोलवर दुखावली गेली आहे. ते बोलायला तिला फार अवघड जात आहे. ऋताने ठरवले की मीना या विषयाबाबत इतकी सावध आणि बंदिस्त आहे, त्यामुळे त्याबाबत जबरदस्तीने, खोदून खोदून शिरकाव करायचा नाही.

मीना काही सेशन्ससाठी आली. ती तिच्या कामाबद्दल, मित्र-मैत्रिणींबद्दल, आई-वडिलांशी असलेल्या नात्याबद्दल बोलत होती. खरे तर तिचे सगळे अगदी चांगले- ‘परफेक्ट’ चालले आहे असेच वाटत होते. इंग्लिशमध्ये ज्याला ‘टू गुड टू बी ट्रू’ म्हणतात ना, तसे!

बोलण्यात मोकळेपणा आल्यावर मीना सांगू लागली की गेल्या काही महिन्यांपासून तिला खूप उदासीनता, चिंता आणि भीती वाटते. आसपास घडणाऱ्या घटनांनी ती ‘ट्रिगर’होते. तिच्या आयुष्यात प्रत्यक्ष काहीही झाले नव्हते, तरीही तिला भीती वाटत होती. ऋताने शांतपणे ऐकून घेतले. घाईनं काहीही विचारणा केली नाही.

आधीच्या सेशन्समध्ये ऋताने मीनाला भावनिक नियंत्रण मिळवायला मदत केली होती. विचार करण्यापूर्वी आणि व्यक्त होण्यापूर्वी मज्जासंस्थेला स्थिर कसे करायचे हेही तिने मीनाला समजावले होते. मदत केली होती. यामुळे मीनाला थोडे बरे वाटू लागलं आणि बोलायची इच्छा होऊ लागली.

हळूहळू मीनाने तिच्या बालपणीच्या लैंगिक शोषणाच्या घटनेबद्दल सांगायला सुरुवात केली. तेव्हा ती १३ वर्षांची होती. तिच्या चुलतभावानेच तिला हा त्रास दिला होता. तो तिच्यापेक्षा बराच मोठा होता. तिनं आईला घडला प्रकार सांगितला, पण आईने सांगितले की याची वाच्यता कुठेही करायची नाही. शिवाय आईनं तिला दटावलेही, ‘‘तू सावधगिरी का बाळगली नाहीस? मुलगे आणि पुरुष असेच असतात. आपणच स्वतःची काळजी घ्यायची असते.’’ मीनाच्या कुटुंबीयांनी आणि अगदी तिच्या आईनेही या चुलतभावाशी, त्याच्या कुटुंबाशी आजतागायत व्यवस्थित संपर्क ठेवला होता. जणू काहीच घडले नव्हते! ही मीनासाठी दुसरी इजा होती. प्रियजनांच्या वर्तनामुळे लैंगिक शोषणाचं पुनर्आघातीकरण (रिट्रॉमाटायझेशन) ही नेहमी दिसणारी गोष्ट आहे.

मीना आता ३५ वर्षांची होती. तिला अजूनही असेच वाटत होते की सगळी चूक तिचीच होती. तिला तिच्या मित्र-मैत्रिणींवर पूर्ण विश्वास टाकता येत नव्हता. स्वतःची काळजी घेणे, स्वतःचे रक्षण करणे जमत नव्हते. तिला स्वतःचे शरीर आवडत नव्हते. झोप नीट लागत नव्हती. छोट्याशा आवाजानेही ती दचकून जायची. हे तिच्या कुटुंबाला किंवा सहकाऱ्यांना माहीत नव्हते. त्यांना घरी आणि ऑफिसमध्ये मीनाचा केवळ हसरा, आनंदी चेहरा दिसत होता.

मीना आपल्या समस्या लपवण्यात यशस्वी झाली होती, अगदी तिच्या आईने तिला शिकवले होते तसे. कुटुंबीयांकडून, विश्वासातल्या माणसांकडून लैंगिक अत्याचाराला बळी पडणे, हे अनेक मुली, स्त्रिया आणि अगदी मुलगे व पुरुषांबाबतही घडते. ज्या ठिकाणी सुरक्षिततेची भावना यायला हवी, तेच ठिकाण- म्हणजे घर, आयुष्यभरासाठी असुरक्षित बनते. पीडित व्यक्तीच्या कथनावर विश्वास न ठेवणे हे त्या व्यक्तीला आयुष्यभर ‘ट्रॉमाटाइज्ड’ ठेवते. यामुळे होणाऱ्या मानसिक आरोग्याच्या समस्या व त्यांचे आकडे भयावह आहेत. लैंगिक शोषणाच्या प्रकरणांत पीडित व्यक्तीच्या मानसशास्त्रीय पैलूंचा गंभीरपणे विचार करणे आणि आधार देणे ही काळाची गरज आहे. संशोधनातून हे सिद्ध झाले आहे, की लहानपणी लैंगिक अत्याचार झाल्यास आयुष्यभर नैराश्य आणि चिंता यांचा त्रास होऊ शकतो. सामाजिक-व्यावसायिक क्षेत्रात अडचणी निर्माण होऊ शकतात. नातेसंबंध आणि विवाहसंबंधांवरही त्याचा परिणाम होऊ शकतो.

ऋताने मीनाचे प्रकरण अत्यंत हळुवारपणे, सहानुभूतीने आणि कौशल्याने हाताळले. तिच्या आधी निदान न झालेल्या अंगदुखीचे मूळ तिच्या मनातील दु:खात आहे, असे हळूहळू लक्षात आले. ऋताने मीनाला आघातातून आणि दुःखातून बाहेर काढले. तिला स्थिर करायला मदत केली आणि ‘ट्रॉमा’वर प्रक्रिया करायला साह्य केले. ‘ट्रॉमा’ अर्थात आघात हा खूप दीर्घ आणि एकट्याने सोसण्याचा प्रवास असतो. पण थेरपीमध्ये ऋता मीनाबरोबर होती. आता तिच्या भावनांना सामोरी जाताना ती एकटी असणार नव्हती!

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.