सृजनधारा : करू नको पुन्हा... हा गुन्हा
esakal April 04, 2026 09:45 AM

मंदार कुलकर्णी

प्रेक्षक मोठ्या पडद्यावर ‘धुरंधर’, ‘छावा’, ‘सैय्यारा’ किंवा अगदी ‘महावतार नरसिंहा’सारख्या चित्रपटांना तुफान प्रतिसाद देतात; ओटीटीच्या छोट्या पडद्यावर मात्र त्यांना सस्पेन्स किंवा क्राइम थ्रिलरच जास्त आवडतात. एक खुनी घ्या, अनेकांवर संशय व्यक्त होईल अशी मांडणी ठेवा, प्रत्येक एपिसोडच्या शेवटी धक्का द्या आणि सगळ्यात शेवटी मोठा धक्का द्या, हा यशस्वी वेब सिरीजचा सध्याचा हुकमी फॉर्म्युला आहे.

एकेकाळी रुपेरी पडदा गाजवलेली माधुरी दीक्षित हिनं वेब सिरीजच्या विश्वात पदार्पण केलं ते ‘मिसेस देशपांडे’ या वेब सिरीजद्वारे. या वेब सिरीजचा प्रकार होता‘क्राइम थ्रिलर’. अनेक खुनांचा आरोप असलेल्या एका महिलेला तुरुंगातून बाहेर काढलं जातं आणि पुढे काय काय होतं असं तिचं कथाबीज. विशेष म्हणजे करिना कपूरनं ‘ओटीटी’च्या मंचावर पदार्पण केलं ते ‘जाने जां’ या गुन्ह्यांची पार्श्वभूमी असलेल्या थ्रिलर चित्रपटाद्वारे; आणि नंतर वेब सिरीज केली तीही ‘द बकिंगहॅम मर्डर्स’ ही ‘सस्पेन्स थ्रिलर’ प्रकारची. सोनाक्षी सिन्हानंही पहिली वेब सिरीज केली तिचं नावच होतं ‘दहाड’.

ही फक्त काही मोजकी उदाहरणं आहेत; पण विचारात पाडणारी आहेत. या नायिका मोठ्या पडद्यावर ज्या प्रकारच्या भूमिकांसाठी ओळखल्या जातात, त्याच्यापेक्षा अगदी वेगळ्या प्रकारच्या वेब सिरीजची निवड त्यांनी पदार्पणासाठी केली आहे. याचं कारण काय असेल? अर्थातच ‘सस्पेन्स’ किंवा ‘क्राइम थ्रिलर’ प्रकारांमध्ये केंद्रस्थानी असलेली व्यक्तिरेखा साकारण्यासाठी अभिनयाला वाव मिळतो हे तर कारण आहेच; पण मुळात सिरीज यशस्वी होण्याचीही खात्री आहे हे जास्त महत्त्वाचं कारण असेल का? प्रेक्षकांनी अशा प्रकारच्या सिरीज बघण्याची, त्यातही त्यांचे सगळे एपिसोड क्रमानं बघण्याची आणि ते एपिसोड पूर्ण बघण्याची त्यांना पुरेपूर खात्री आहे. एक खुनी घ्या, थोडं प्रेक्षकांना माहीत नसलेलं वातावरण घ्या, त्याच्या नातेवाईकांपासून ओळखीच्यांपर्यंत अनेकांवर संशय व्यक्त होईल अशी मांडणी ठेवा, प्रत्येक एपिसोडच्या शेवटी धक्का द्या आणि सगळ्यात शेवटी प्रेक्षक चक्रावून जातील असा धक्का द्या... हा यशस्वी वेब सिरीजचा सध्याचा हुकमी फॉर्म्युला आहे. खुनांची मालिका असेल, मनोविकार असलेला खुनी असेल आणि त्यातही सिरिअल किलर असेल तर अक्षरशः ‘सोने पे सुहागा’. देशाच्या ठिकठिकाणच्या कानाकोपऱ्यांतून वेब सिरीजचे लेखक, दिग्दर्शक कुठल्या तरी खुनांच्या धक्कादायक बातम्यांतून किंवा कल्पित घटनांचा वापर करून अशा सिरीजची ‘बाटली’ प्रेक्षकांपुढे ठेवतात आणि प्रेक्षक त्या धुंदीत सिरीज एका दमात संपवून टाकतात हे विशेष.

खरं तर ओटीटी विश्वात प्रयोग होत नाहीत असं नाही. संजय लीला भन्साळी यांची ‘हिरामंडी’ तर खूपच गाजली. ‘कोटा फॅक्टरी’, ‘पंचायत’ अशाही विविधांगी विषयांवरच्या मालिका ओटीटीवर आहेतच; पण सगळ्यात जास्त बघितल्या जातात किंवा पसंती आहे ती गुन्ह्यांशी संबंधित सिरीजना ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. प्रेक्षक मोठ्या पडद्यावर ‘धुरंधर’सारख्या ॲक्शन चित्रपटाला, ‘छावा’सारख्या ऐतिहासिक विषयावरच्या चित्रपटाला, ‘सैय्यारा’सारख्या प्रेमकथेला किंवा अगदी ‘महावतार नरसिंहा’सारख्या पौराणिक चित्रपटाला तुफान प्रतिसाद देतात; छोट्या पडद्यावर मात्र त्यांना सस्पेन्स किंवा क्राइम थ्रिलरच जास्त आवडतात हे खरं आहे.

चित्रपटांपेक्षा वेब सिरीजचा कालावधी जास्त असतो, आणि प्रत्येक एपिसोडच्या शेवटी धक्का नसला तर पुढचा एपिसोड बघण्याची मजा निघून जाते, त्यामुळे थ्रिलर त्यात परफेक्ट बसतात हे बरोबर आहे. चित्रपट हे समूहानं बघण्याचं माध्यम आहे, तर ओटीटी हे घरात बसून बघण्याचं माध्यम. त्यामुळे प्रत्येकातच असलेली ‘ब्लॅक शेड’ घरातल्या अंधाऱ्या वातावरणात वेब सिरीजच्या आवडीत प्रतिबिंबित होते का, हाही एक मानसशास्त्रीय विश्लेषणाचा विषय आहे. अजून एक गंमत आहे. वेब सिरीज बघितल्या जाण्याचा सगळ्यात जास्त वेळ आहे तो रात्री उशिराचा. त्या वेळेचा आणि गुन्ह्यांचाही निकटचा संबंध आहे, हेही उल्लेखनीय आहे. एक असंही आहे, की ओटीटीला अजून सेन्सॉरशिप नाही. त्यामुळे थोडे अस्वस्थ करणारे विषय, दृश्यं चालू शकतात. गुन्ह्यांबरोबर येणाऱ्या शिव्या, आक्षेपार्ह दृश्यंही इथं चालू शकतात. अनेक गुन्ह्यांबाबतचे विषय हे चित्रपटाच्या वेळेत मावणारे नसतात आणि ओटीटीवर ते विस्तारानं मांडता येऊ शकतात, हेही खरं आहे. अर्थातच उत्कंठा हाही विषय आहे. वेब सिरीज पूर्ण बघण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा ‘हूक पॉइंट’ आहे उत्कंठेचा आणि तिथं सस्पेन्स आणि ‘क्राइम थ्रिलर’ फिट बसतात.

... पण पूर्वी जेव्हा घरात टीव्ही होता आणि सगळ्या कुटुंबानं एकत्र बघण्यासारखे कार्यक्रम असायचे, त्यांची जागा आता तोच टीव्ही स्मार्ट झाल्यावर गुन्हेविषयक मालिकांनी का घेतली हा समाजशास्त्रीय विश्लेषणाचा विषय नक्की आहे. क्राइम, सस्पेन्स थ्रिलर प्रकारच्या मालिका एकट्यानं किंवा फार तर दोन-तीन सदस्यांकडून बघितल्या जातात. कुटुंबाचं दुभंगलेपण या आवडीतून प्रतिबिंबित होत नाही ना, किंवा आजूबाजूच्या सुटत चाललेल्या परिस्थितीबाबतचं वैफल्य या आवडीत दिसत नाही ना, असेही प्रश्न उपस्थित होतात; पण या प्रश्नाची उत्तरं मात्र शक्यतो प्रत्येकाला स्वतःलाच शोधावी लागतील हेही तितकंच खरं.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.