IPL 2026 : मुंबई इंडियन्सने दुसर्‍या सामन्यात सूर्यकुमार यादवला दिलं कर्णधारपद; कारण…
GH News April 04, 2026 06:11 PM

आयपीएल 2026 स्पर्धेत मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स दुसरा सामना खेळत आहे. दोन्ही संघांनी पहिल्या सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे या सामन्यातून विजयाची गाडी पुढे कोण नेते? याची उत्सुकता आहे. या सामन्यापूर्वी नाणेफेकीचा कौल झाला आणि दिल्ली कॅपिटल्सच्या बाजूने लागला. दिल्ली कॅपिटल्सने प्रथम गोलंदाजी स्वीकारली. पण हा निर्णय होत असताना हार्दिक पांड्याच्या जागी सूर्यकुमार यादव येण्याचं कारण काय? असा प्रश्न क्रीडाप्रेमींना पडला. दुसऱ्या सामन्यातच हार्दिक पांड्याची जागा सूर्यकुमार यादवने घेतल्याने आश्चर्य व्यक्त केलं गेलं. अचानक बदल करण्याचं कारण अनेकांना कळलं नाही. हार्दिक पांड्या खेळणार आहे की नाही असे प्रश्न अनेकांना पडले. पण या प्रश्नाचं उत्तर कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेकीचा कौल झाल्यानंतर लगेच दिलं. हार्दिक पांड्याबाबतही त्याने स्पष्ट काय ते सांगून टाकलं.

काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

सूर्यकुमार यादव म्हणाला की, ‘हार्दिक पांड्याला बरं वाटत नाही. तो आजच्या सामन्यासाठी फिट नाही. त्यामुळे त्याची जबाबदारी आज माझ्या खांद्यावर आली आहे.’ मुंबई इंडियन्सने आयपीएल स्पर्धेत 14 वर्षानंतर पहिला सामना जिंकला. या प्रश्नावर सूर्यकुमार यादवने आपलं मत व्यक्त केलं. ‘जेव्हा तुम्ही १३-१४ वर्षांनंतर पहिला सामना जिंकता, तेव्हा संघात खूप सकारात्मकता असते आणि आम्ही खूप आनंदी आहोत, पण हे ठिकाण वानखेडेपेक्षा पूर्णपणे वेगळे आहे. आम्हाला चांगली जबाबदारी घ्यावी लागेल आणि येथे चांगला खेळ करावा लागेल.’, असं सूर्यकुमार यादव म्हणाला.

सूर्यकुमार यादव खेळपट्टी आणि प्लेइंग 11 बाबत म्हणाला की, ‘खेळपट्टी चांगली दिसतेय, नाणेफेकीचा काही संबंध नव्हता. आम्हाला प्रथम फलंदाजी करायची होती, त्यांना प्रथम गोलंदाजी करायची होती. प्रथम फलंदाजी केल्याचा खूप आनंद आहे. खेळपट्टी चांगली दिसतेय. जेव्हा आम्ही येथे प्रथम फलंदाजी करून धावांचा बचाव केला आहे, तेव्हा आम्ही खूप चांगली कामगिरी केली आहे. संघात बरेच बदल आहेत. हार्दिकच्या जागी दीपक चहर, बोल्टीच्या जागी कॉर्बिन बॉश आणि अल्लाह गझनफरच्या जागी मिच सँटनर आला आहे. हा एक रणनीतिक बदल आहे.’

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.