तात्या लांडगे
सोलापूर : पवित्र पोर्टलवरुन खासगी अनुदानित शाळांमधील शिक्षक भरतीवेळी एका पदासाठी तीन उमेदवारांना पाठविण्यात येत होते. त्यावेळी अनेक संस्था गुणवत्तेपेक्षा डोनेशनला प्राधान्य द्यायचे, तशा तक्रारी शिक्षण विभागाकडे आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर आता संस्थेला मुलाखतीसाठी २५ गुणांऐवजी १० गुण द्यावे लागतील. बाकीचे ९० गुण टीईटी व त्या उमेदवाराच्या इयत्ता बारावीनंतरच्या शिक्षणासाठी द्यावे लागणार आहेत. त्यामुळे गुणवत्ताधारक उमदेवाराचीच निवड संस्थांना करावी लागणार आहे.
शालेय शिक्षण विभागाच्या वतीने २०२६-२७ या शैक्षणिक वर्षात सुमारे नऊ ते दहा हजार शिक्षकांची पदे भरली जाणार आहेत. पवित्र पोर्टलवर आता उमेदवारांना ५० ऐवजी १०० शैक्षणिक संस्थांचे पर्याय तथा पसंतीक्रम निवडता येणार आहेत. खासगी संस्थांना उमेदवार निवडताना ‘टीईटी किंवा टेट’च्या गुणाला ७५ गुण द्यावे लागतील. विशेष प्राविण्यासह, प्रथम व द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या उमेदवाराला अनुक्रमे पाच, तीन, दोन गुण द्यावे लागणार आहेत. दुसरीकडे एका पदासाठी तीन उमेदवारांना पाठविल्यावर त्यातून गुणवत्ताधारक उमेदवाराचीच निवड संस्थेला करावी लागणार आहे.
गुणवत्ता असूनही संस्थेने डावलल्यास त्या उमदेवाराला पहिल्यांदा शिक्षणाधिकाऱ्यांकडे जिल्हास्तरावर न्याय मागता येणार आहे. त्याठिकाणी समाधान न झाल्यास तो उमेदवार शिक्षण उपसंचालकांकडे दाद मागता येणार आहे. शालेय शिक्षण विभागाने आता १७ हजार माध्यमिक शाळांमधील कार्यरत शिक्षकांची पडताळणी सुरु केली आहे. प्रत्येक शिक्षकाचे स्वतंत्र प्रोफाईल तयार करुन त्यांची माहिती ठेवली जाणार आहे.
९००० शिक्षकांची पवित्र पोटर्लद्वारे भरती
सध्या अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन सुरु असून पुढील आठ-दहा दिवसांत रिक्त पदांच्या जाहिराती मागवून घेतल्या जाणार आहेत. १५ मेपर्यंत पहिली निवड यादी प्रसिद्ध होईल, यादृष्टीने शिक्षक भरतीचे नियोजन शिक्षण विभागाने केले आहे. जिल्हा परिषदांच्या शाळांसह खासगी अनुदानित प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील सुमारे ९ हजार शिक्षकांची पदे या भरतीत भरली जाणार आहेत.
शिक्षक भरतीतील गुणदान असे...
टीईटी : ७५ गुण
व्यावसायिक पात्रता : ८ गुण
शैक्षणिक पात्रता : ७ गुण
मुलाखत, अध्यापन कौशल्य : १० गुण
एकूण गुण : १००