पुणे - शहरातील नाले सफाई आणि पावसाळी गटारांच्या स्वच्छतेच्या निविदा ९ टक्क्यांपासून ते ५२ टक्क्यांपर्यंत कमी दराने आल्या आहेत. महापालिकेच्या पूर्वगणनपत्रकापेक्षा ५० टक्के कमी खर्चात ठेकेदार काम करण्यासाठी तयार होत आहे. त्यामुळे नाले सफाईची कामे प्रत्यक्षात होणार की केवळ बिले काढून तिजोरीची सफाई होणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, गेल्या महिन्यात स्थायी समितीच्या बैठकीत कमी दराच्या निविदेवरून बराच वादंग झाल्याने आता यासंदर्भात या निर्णय होणार याकडे लक्ष लागले आहे.
पुणे महापालिकेतर्फे दरवर्षी पावसाळ्याच्या पूर्वी १५ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील नाले आणि पावसाळी गटार स्वच्छता करण्यासाठी निविदा काढली जाते. २०२६-२७ या वर्षासाठी महापालिकेने प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयासाठी नाले सफाई आणी पावसाळी गटारांच्या स्वच्छतेसाठी प्रत्येकी १ कोटी रुपये म्हणजे एकूण ३० कोटी रुपयांचे पूर्वगणनपत्रक तयार केले आहे. यंदाच्या वर्षी मलनिःसारण विभागाकडून निविदा प्रक्रिया राबविण्याऐवजी क्षेत्रीय कार्यालयांकडून निविदा राबविण्यात आली आहे.
प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयात या दोन्ही कामांच्या निविदासांठी पुरेशी स्पर्धा झाली आहे. पण अनेक ठेकेदारांनी ३० टक्के ते ५२ टक्के कमी दराने निविदा भरल्या आहेत. नाले सफाईपेक्षा पावसाळी गटारांच्या निविदा कमी दराने आलेल्या आहेत. गेल्या आठवड्यात पावसात पावसाळी गटारांमध्ये प्रचंड प्रमाणात माती, दगड गेले. त्यामुळे गटार तुंबल्याने रस्त्यावर पाणी जमा झाले होते. पण आता ५० टक्के कमी दराने आलेल्या निविदांमुळे ठेकेदार व्यवस्थित काम करणार का? याकडे लक्ष लागले आहे.
प्रशासनाचे पूर्वगणनपत्रक फुगवले?
महापालिकेने शहरभर पावसाळी गटारांच्या स्वच्छतेसाठी प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयांतर्गत १० ते ११ हजार पावसाळी चेंबर असल्याचे दाखवले आहे. पण प्रत्यक्षात प्रत्येक भागात ३ ते ४ हजारांपर्यंतच चेंबर आहेत. अधिकाऱ्यांनी खोटे आकडे टाकून पूर्वगणनपत्रक फुगविले असल्याची चर्चा प्रशासनात आहे.