RR vs MI Live: मुंबई इंडियन्सचे 'तारे जमीन पर'! राजस्थान रॉयल्सची विजयी हॅटट्रिक; IPL 2026 Point Table मध्ये मोठा बदल
esakal April 08, 2026 04:45 AM

Rajasthan Royals vs Mumbai Indians Marathi Update : राजस्थान रॉयल्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मधील आपली विजयी घोडदौड कायम राखली. पावसामुळे ११-११ षटकांच्या या सामन्यात RR ने गुवाहाटीच्या खेळपट्टीवर मुंबई इंडियन्ससमोर १५१ धावांचे लक्ष्य ठेवले. यशस्वी जैस्वाल ( नाबाद ७७) आणि वैभव सूर्यवंशी ( ३९) यांच्या आक्रमक फटकेबाजीने MI च्या स्टार गोलंदाजांना हतबल केले. त्यानंतर RR च्या गोलंदाजांनी मुंबईच्या फलंदाजांना गुंडाळले. राजस्थानने सलग तिसरा विजय मिळवून IPL 2026 Point Table मध्ये अव्वल स्थान पटकावले.

RR च्या युवा फलंदाजांनी समोरच्या संघात ट्वेंटी-२० वर्ल्ड कप विजेत्या संघातील खेळाडूंची फौज आहे, हे काही काळासाठी विसरायला भाग पाडले. यशस्वीने पहिल्याच षटकात दीपक चहरला फैलावर घेताना २२ धावा कुटल्या. त्यानंतर १५ वर्षीय वैभवने आडवा पट्टा चालवताना जसप्रीतचा पहिलाच चेंडू ८८ मीटर लांब भिरकावला. या सामन्यातही हा सर्वात चकीत करणारा क्षण होता. जगातील महान गोलंदाजाचे असे स्वागत, तेही १५ वर्षाच्या खेळाडूकडून होणे कोणालाही अपेक्षित नव्हते. त्यात चौथा चेंडूही त्याने डीप स्क्वेअर लेगला भिरकावला.

IPL 2026 Orange Cap : नाद करा, या पोरांचा नको... यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशीने 'ऑरेंज' कॅप शर्यतीत रोहितला मागे सोडले;Top Five List

वैभव व यशस्वी जोडीने ५ षटकांत ८० धावा जोडल्या. वैभव १४ चेंडूत १ चौकार व ५ षटकारांसह ३९ धावांवर झेलबाद झाला. ध्रुव जुरेल ( २) आणि रियान पराग ( २०) यांना अल्ला घझनफरने बाद केले. यशस्वी एका बाजूने मैदानावर शड्डू ठोकून उभा राहिला आणि त्याने ३२ चेंडूंत १० चौकार व ४ षटकारांच्या मदतीने ७७ धावांची नाबाद खेळी केली. राजस्थानने ११ षटकांत ३ बाद १५० धावांचा डोंगर उभा केला. RR कडून आयपीएलमध्ये १०० हून अधिक षटकार मारणारा यशस्वी चौथा फलंदाज ठरला. या विक्रमात संजू सॅमसन ( १९२), जॉस बटलर ( १३५) व शेन वॉटसन ( १०९) हे पुढे आहेत.

आयपीएलमध्ये १५० अधिक धावांच्या लक्ष्याचा पाठलाग सर्वात कमी षटकांत करण्याचा विक्रम सनरायझर्स हैदराबादच्या नावावर आहे. त्यांनी २०२४ मध्ये लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध १६६ धावांचे लक्ष्य ९.४ षटकांत पार केले होते. रायन रिकेल्टने षटकार मारून आक्रमकता दाखवली, परंतु जोफ्रा आर्चरने पुढचा चेंडू आखूड टप्प्यात टाकला आणि रिकेल्टनचा जागच्या जागी उत्तुंग झेल उडाला. ध्रुव जुरेलने ८ धावा करणाऱ्या रिकेल्टनचा झेल टिपला. सूर्यकुमार यादवही ६ धावांवर नांद्रे बर्गरच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला.

RR vs MI Live: हटा सावन की घटा... वैभव सूर्यवंशीचा तोरा... जसप्रीत बुमराहचा पहिलाच चेंडू षटकार, ३ चेंडूंत कुटल्या १३ धावा, Video

रोहितला ( ५) रोखण्यासाठी संदीप शर्माला आणले गेले आणि रियान परागचा हा डाव यशस्वी ठरला. रोहित पायचीत झाला आणि मुंबईने २२ धावांत ३ फलंदाज गमावले. हार्दिक पांड्या ( ९) व तिलक वर्मा ( १४) यांच्याकडून खूप अपेक्षा होत्या, परंतु दोघंही एकाच षटकात माघारी परतले. रवी बिश्नोईने डावातील त्याच्या पहिल्याच षटकात राजस्थानला दोन विकेट्स मिळवून दिल्या. मुंबईला ५० धावांचा टप्पा ओलांडण्यासाठी ६ षटकं लागली.

शेरफान रदरफर्ड आणि नमन धीर यांनी चांगली फटकेबाजी करून सामन्यात चुरस निर्माण केली होती. या दोघांची १७ चेंडूंत ४७ धावांची भागीदारी तुषार देशपांडेने तोडली. रदरफर्ड ८ चेंडूंत २ चौकार व २ षटकारांसह २५ धावांवर संदीप शर्माच्या अफलातून कॅचवर बाद झाला. नमनही १३ चेंडूंत २५ धावांवर बाद झाला आणि मुंबईच्या विजयाच्या आशा मावळल्या. नांद्रे बर्गर, बिश्नोई व संदीप शर्मा यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. मुंबईला ९ बाद १२३ धावा करता आल्या राजस्थानने २६ धावांनी हा सामना जिंकला.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.