राज्याचे लक्ष लागलेल्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. दरम्यान कॉंग्रेसने सुनेत्रा पवाराविरोधात उमेदवार दिल्याने राज्यभर चर्चा सुरु आहे. सुनेत्रा पवार यांनी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना फोन करुन माघार घेण्याची विनंती केली आहे. अशातच आता शरद पवार यांनीही बारामतीची निवडणूक कॉंग्रेसने बिनविरोध करावी असा सल्ला दिला आहे. यावर हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर रिक्त जागेवर त्यांच्या पत्नी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार निवडणूक लढवत आहेत. बारामतीची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी महायुतीचे प्रयत्न आहेत. मात्र कॉंग्रेसने उमेदवार दिल्याने ही निवडणूक बिनविरोध होण्याची आशा धुसर झाली .
सुनेत्रा पवार यांनी हर्षवर्धन सपकाळ यांना दोन वेळा फोन केला. यानंतर गुरुवारी सकाळी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी देखील सपकाळ यांची भेट घेतली, यानंतर शरद पवार यांनी देखील बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध करावी अशी कॉंग्रेसला सल्ला दिला. यावर शरद पवार यांनी काय सल्ला द्यावा तो त्यांचा अधिकार आहे, मात्र याबाबत वरिष्ठांशी चर्चा करुन आम्ही निर्णय घेऊ,असे हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रतिक्रिया दिली.
रोहित पवार यांनी व्यक्त केली दिलगिरीदरम्यान रोहित पवार यांनी सपकाळ यांच्या भेटीत पार्थ पवार यांनी कॉंग्रेसबाबत केलेल्या वक्तव्याबाबत दिलगिरी व्यक्त केली. काँग्रेसने बारामतीत उमेदवार दिल्यामुळे काँग्रेसचा डाऊनफॉल सुरू झाल्याचे वक्तव्य पार्थ पवार यांनी केले होते. त्यानंतर शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी पार्थला राजकीय परिपक्वतेबाबत सुनावले होते. मात्र रोहित पवार यांनी पार्थच्या वतीने सपकाळांकडे दिलगिरी व्यक्त केली आहे. तसेच कॉंग्रेस सकारात्मक निर्णय घेईल अशी आशा असल्याचे त्यांनी सांगितले.