काँग्रेसची बारामती पोटनिवडणुकीतून माघार, जय पवार यांची पहिली प्रतिक्रिया, काँग्रेसचे मानले आभार…
Tv9 Marathi April 09, 2026 07:45 PM

अजित पवार यांच्या निधनानंतर बारामती विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली होती. या विधानसभा मतदारसंघात आता पोट निवडणूक होत आहे. महायुतीकडून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर काँग्रेसकडून आकाश मोरे हे निवडणुकीच्या रिंगणात होते. मात्र उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे ही निवडणूक आता महायुतीसाठी सोपी झाली आहे. मात्र जरी आकाश मोरे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला असला तरी देखील ही निवडणूक बिनविरोध होणार नाहीये. या निवडणुकीसाठी एकूण 53 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यातील 30 जणांनी माघार घेतली आहे, मात्र अजूनही 23 जण  निवडणुकीच्या रिंगणात आहेत. दरम्यान काँग्रेसने निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर आता यावर राष्ट्रवादीचे नेते जय पवार यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

नेमकं काय म्हणाले जय पवार?

आम्हाला सर्वांना आधीपासूनच वाटत आहे की, ही निवडणूक बिनविरोध व्हायला पाहिजे. आकाश मोरे आणि त्यांच्या पक्षाने काँग्रेसने देखील खूप चांगला निर्णय घेतला. ही निवडणूक महत्त्वाची का आहे कारण? ही निवडणूक आपण दादांसाठी लढत आहोत. दादांनी अनेक दशकं महाराष्ट्रासाठी खूप काम केलं आहे. अजितदादांनी सर्वच पक्षांना एकत्र घेऊन कामं केली आहेत. एकेकाळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी पण एकत्र होते. तेव्हा पण आपलं सरकार होतं, आतापण महायुतीचं सरकार आहे. पण मला वाटतं की सर्वच पक्षातील वरिष्ठांनी चांगला निर्णय घेतला. दादांना खरी आदरांजली म्हणून हा निर्णय घेतला आहे. मी त्यांच्या सर्वांचे खूप खूप आभार मानतो.

कालपासून आम्ही सर्वच उमेदवारांना भेटत आहोत. जेवढे फॉर्म माघारी घेता येतील, तेवढे फॉर्म माघारी घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. ज्यांनी -ज्यांनी या पोटनिवडणुकीसाठी फॉर्म भरले आहेत, त्यांच्या छोट्या-छोट्या मागण्या आहेत. यातील काही जणांनी म्हटलं की आमची काम अडकली आहेत, कुणी म्हटलं की आम्हाला आधी तुमच्यापर्यंत पोहचू दिलं नाही. जास्तीत जास्त उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. त्यानंतर पुढचा निर्णय घेतला जाईल. महत्त्वाची गोष्ट म्हणजे काँग्रेस मोठा पक्ष होता. मात्र आता काँग्रेसचे उमेदवार आकाश मोरे यांनी माघार घेतली आहे, ते आपल्यासोबत आहेत. मनाला खूर बरं वाटत आहे की, सर्वच पक्ष एकत्र येऊन ही निवडणूक दादांसाठी लढत आहेत. भविष्यात त्यांच्या पण पक्षाच्या काही अडचणी असतील तर आम्ही देखील त्यांना मदत करू मी काँग्रेसचे आभार मानतो असं यावेळी जय पवार यांनी म्हटलं आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.