Nashik : नाशिक जिल्ह्यात निफाड तालुक्यात धक्कादायक घटना घडली आहे. टांगा शर्यतीचा मोह वृद्धाच्या जीवावर बेतला आहे. निफाड तालुक्यातील नांदुर्डी येथील हरिभुसा महाराज यात्रेनिमित्त टांगा शर्यती आयोजित करण्यात आल्या होत्या. त्या शर्यती पाहण्यासाठी आलेल्या रामनाथ विठ्ठल शिंदे यांना टांग्याची धडक बसून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. -ही घटना मोबाईलचा कॅमेरेमध्ये कैद झाली आहे.
निफाड पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याप्रकरणी 7 आयोजकांवर निफाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अद्याप अटक झालेली नाही. आरोपीच्या शोधात निफाड पोलिसांचे पथक रवाना झाले आहे.
नागपूरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. मद्यधुंद कारचालकाच्या निष्काळजीपणामुळं भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या भीषण अपघातात ज्येष्ठ नागरिक पती-पत्नीचा मृत्यू झाला आहे. बेलतरोडी पोलीस हद्दीत काल मध्यरात्री हा धक्कादायक प्रकार घडला आहे. उपचारादरम्यान जखमी पती-पत्नीचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मनिष नगर-बेसा मार्गावरील पूर्ती बाजार परिसरात काल मध्यरात्रीच्या दरम्यान हा अपघात घडला. मद्यप्राशन करून भरधाव वेगात कार चालवत असलेल्या पंकज डेकाटे या बँक अधिकाऱ्याने दुचाकीवरील विजय सावरकर आणि सुरेखा सावरकर या दाम्पत्याला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, दोन्ही दांप्मत्य कारखाली बऱ्याच अंतरापर्यंत फरफटत गेलं. दरम्यान, अपघातानंतर आरोपी चालक घटनास्थळावरून फरार झाला होता. स्थानिक नागरिकांनी जखमींना तात्काळ मेडिकलमध्ये दाखल केलं. मात्र, आज उपचारादरम्यान दोघांचे ही.मृत्यू झाले आहे. बेलतरोडी पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल करत आरोपीला ताब्यात घेतलं आहे. पुढील तपास सुरू आहे.
वाहतूक कोंडीमुळं मनमाड शहरातून जाणाऱ्या इंदूर-पुणे महामार्गावर अपघात झाल्याची घटना घडली आहे. इंधन वाहून नेणाऱ्या ट्रकने दुचाकीला धडक दिली आहे. दुचाकीवरील दोन व्यक्ती गंभीर जखमी झाले आहेत. अपघातात नागरिकाने पाय गमावला आहे. इंदूर- पुणे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक कोंडी ही नित्याचीच झाली असून याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे..मनमाड - मालेगाव चौफुली येथे दुचाकीवरून जाणाऱ्या दोन व्यक्तीना इंधन भरून जाणाऱ्या भरधाव ट्रकने धडक दिल्याने अपघात घडला आहे. या अपघातामध्ये दोन जण गंभीर जखमी झाले आहे.. त्यांना पुढील उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.