Eknath Shinde Big reaction on Operation Tiger: राज्याच्या राजकारणात महाभूकंप येणार अशा चर्चांनी पुन्हा जोर धरला. एकनाथ शिंदे गेल्या महिन्यात दिल्लीत ठाण मांडून होते. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. त्याचवेळी खासदारांशी चर्चा केली. या भेटीदरम्यान उद्धव सेनेचे काही खासदारांशी त्यांनी संपर्क साधल्याचा दावा करण्यात आला. ते मुंबई दाखल झाल्यावर तर उद्धव सेनेचे 8 खासदार गळाला लागल्याच्या चर्चांनी जोर धरला. पण मध्यंतरी या चर्चा थंड बस्त्यात गेल्या. तर आज एकनाथ शिंदे हे सातारा जिल्ह्यातील त्यांच्या दरे गावी गेले आणि पुन्हा उद्धव सेनेला खिंडार पडण्याच्या जोर बैठका सुरू झाल्या. आता स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पडदा टाकला आहे.
एकनाथ शिंदे यांचे थेट उत्तर
एकनाथ शिंदे हे दरे गावी असताना ते ऑपरेशन टायगर राबवणार असल्याचा दावा करण्यात येत होता. त्यात उद्धव सेनेचे 8 खासदार शिंदे गोटात येण्याचा दावा करण्यात आला होता. 24 तारखेला शिवसेना कुणाची याची अंतिम सुनावणी होणार आहे. त्यापूर्वीच या चर्चा रंगल्या आहेत. खासदार अरविंद सावंत यांनी याविषयीचे वृत्त धादांत खोटी असल्याचे आणि हा खोडसाळपणा असल्याचा आरोप केला. त्यानंतर एकनाथ शिंदे गोटातूनही पटापट प्रतिक्रिया समोर आल्या. अगोदर खासदार श्रीकांत शिंदे यांनी हे वृत्त निराधार असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर आता एकनाथ शिंदे यांनी सुद्धा त्यावर मौन सोडले.
“उबाठाच्या खासदारांसोबत झालेल्या कथित बैठकीचे वृत्त पूर्णपणे निराधार, खोडसाळ आणि गैरसमज निर्माण करणारे आहे. अशी कोणतीही बैठक झालेली नाही. उबाठाचे खासदार फुटून शिवसेनेत येणार असल्याच्या बातम्या गेल्या एक-दीड वर्षांपासून पसरवल्या जात आहेत. परंतु, त्यात कोणतेही तथ्य नाही. ती केवळ अफवा आहे. त्यामुळे सनसनाटी निर्माण करण्यासाठी अशा पद्धतीच्या बातम्या देणे माध्यमांनी टाळले पाहिजे.” अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री आणि शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी दिली.
अखेर ऑपरेशन टायगरवर पडदा
एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री संजय शिरसाट यांनी तर ऑपरेशन टायगर विषयी एका महिन्यात तुम्हाला ठोस माहिती मिळेल. कोण येणार आणि कधी येणार याविषयीचे संकेत देण्याचे असे प्रयत्न होत असतानाच मंहसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे हे त्यांच्याच खासदारांना वेळ देत नसल्याने बहुधा ते एकनाथ शिंदेंच्या संपर्कात आले असावेत असा चेंडू टाकला. तर यापूर्वी खासदार ज्योती वाघमारे यांनी ऑपरेशन टायगर आणि ऑपरेशन तुतारी होणार असल्याचा दावा केला होता. आज माध्यमांशी बातचीत करताना माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या वृत्तात काहीच तथ्य नसल्याचे सांगितले. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे खासदार फुटणार नसल्याचे ते म्हणाले. आता खासदार श्रीकांत शिंदे आणि स्वतः उपमुख्यमंत्रीएकनाथ शिंदे यांनी ऑपरेशन टायगरच्या बातमीत तथ्य नसल्याचे सांगत या घडामोडींवर पडदा टाकला.