गुंतवणूकदारांचा एसआयपीवरील विश्वास वाढला, SIP खात्यांची संख्या 10 कोटींच्या पार, 2025-26 मध्ये विक्रमी गुंतवणूक
जगदीश ढोले April 10, 2026 08:13 PM

नवी दिल्ली : अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्ध सुरु झाल्यानंतर जगातील विविध शेअर बाजारांवर परिणाम झाला आहे. जगभरातील शेअर बाजारात तेजी आणि घसरण पाहायला मिळाली होती. मात्र, शेअर बाजारात घसरण सुरु असली तरी रिटेल गुंतवणूकदार म्युच्युअल फंडसमध्ये एसआयपीद्वारे मोठ्या प्रमाणावर पैसे गुंतवत आहेत. असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंडस इन इंडियानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये एसआयपीद्वारे होणाऱ्या गुंतवणुकीत वाढ झाली आहे. 

आर्थिक वर्ष 2025-2026 मध्ये एसआयपीद्वारे म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक349589 कोटी रुपये झाली आहे. मार्च महिन्यात एसआयपीद्वारे 32087 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. 

मार्च महिन्यात एसआयपीद्वारे म्युच्युअल फंडमध्ये विक्रमी गुंतवणूक झाली आहे.AMFI च्या आकडेवारीनुसार रिटेल गुंतवणूकदारांनी एसआयपीच्या माध्यमातून 32087 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. आतापर्यंतची ही विक्रमी गुंतवणूक आहे. फेब्रुवारी 2026 मध्ये म्युच्युअल फंडमध्ये एसआयपीद्वारे 29845 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली होती. जी जानेवारी महिन्यात 31002 कोटी रुपये होती. 

आर्थिक तज्ज्ञांच्या मते भारतीय गुंतवणूकदार शेअर बाजाराचा आधार बनले आहेत. देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदार आता शेअर बाजाराला आधार  देण्यापर्यंत मर्यादित नसून बाजाराचा स्तर निश्चित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. 

एसआयपी खात्यांची संख्या 10 कोटींच्या पार

मार्च महिन्यात एसआयपी खात्यांची संख्या 10.44 कोटींवर पोहोचली आहे. मार्च महिन्यात 52.82 लाख नव्या एसआयपी खात्यांची नोंदणी झाली. तर, 53.38 लाख एसआयपी खाती बंद झाली आहेत. म्हणजेच बंद होणारी खाती आणि सुरु होणाऱ्या खात्यांची संख्या सारखीच आहे. म्हणजेच 9.71 कोटी खात्यांमधून म्युच्युअल फंडमध्ये नियमित गुंतवणूक सुरु आहे. 

आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये 7.19 कोटी नवी एसआयपी खाती सुरु झाली. तर, 6.79 कोटी एसआयपी खाती बंद झाली आहेत, यानंतर देखील एसआयपी खात्यांची संख्या 10.44 कोटींवर पोहोचली आहे. वर्षभरात 9.71 कोटी एसआयपी खात्यांमधून नियमित गुंतवणूक म्युच्युअल फंडात दाखल झाली आहे.

ICRA अनालिटिक्सच्या एका रिपोर्टनुसार एसआयपीद्वारे असेट अंडर मॅनेजमेंटची रक्कम 16.64 लाख कोटींवर पोहोचली आहे. जी म्युच्युअल फंड उद्योगाच्या 20 टक्के इतकी आहे. एकूणच आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये एसआयपीची ग्रोथ चांगली राहिली. बाजारात अस्थिरता असून देखील लोक शिस्तबद्धपणे गुंतवणूक करत आहेत.

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.