अंबाडी येथे जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा
esakal April 10, 2026 10:45 PM

वज्रेश्वरी, ता. १० (बातमीदार) : ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मार्गदर्शनाखाली जिजाऊ संघटनेतर्फे जिजाऊ संस्थेचे संस्थापक नीलेश सांबरे यांच्या वाढदिवसानिमित्त ‘जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा २०२६’चे होणार आहे. ही स्पर्धा ११, १२ व १३ एप्रिलदरम्यान दररोज सायंकाळी ६ वाजता पार पडणार आहे.
तीन दिवसीय स्पर्धा ठाणे जिल्ह्यातील कबड्डीप्रेमींसाठी आकर्षण ठरणार असून विविध संघांचा सहभाग अपेक्षित आहे. स्पर्धेचे उद्घाटन शनिवारी (ता. ११) सायंकाळी ६ वाजता भगवान महादेव सांबरे व भावनादेवी सांबरे यांच्या हस्ते होणार आहे. विजेत्या संघांना एकूण अडीच लाख रुपयांची बक्षिसे, रोख पारितोषिके व आकर्षक चषक प्रदान करण्यात येणार आहेत. तसेच उत्कृष्ट खेळाडू, उत्कृष्ट चढाई आणि उत्कृष्ट पकड यांसाठी विशेष पुरस्कारही दिले जाणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. याशिवाय प्रेक्षकांसाठी ‘लकी ड्रॉ’चे असणार आहे. कुलर, मिक्सर, इस्त्री आदी आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी आहे. ही स्पर्धा अंबाडी नाका येथील श्री संत ज्ञानेश्वर मंदिराशेजारील मैदानावर होणार आहे. कार्यक्रमाचे आयोजन मोनिका पानवे यांच्या नेतृत्वाखाली होत असून स्थानिक मंडळांचा सक्रिय सहभाग आहे. जिजाऊ संघटना, भिवंडीच्या कार्यकर्त्यांनी या स्पर्धेसाठी विशेष परिश्रम घेतले आहेत. या उपक्रमामुळे ठाणे जिल्ह्यात कबड्डी खेळाला चालना मिळेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.