इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धामुळे भारताला होणाऱ्या तेल पुरवठ्यात अडथळा निर्माण झाला होता. मात्र आता भारतासह संपूर्ण जगासाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुज सामुद्रधुनीवरील नाकेबंदी हटवण्याची घोषणा केली आहे. ट्रंप यांनी एक निवेदन जारी केले आहे. यात त्यांनी म्हटले की, ‘आता आम्ही होर्मुझ पूर्णपणे खुले करत आहोत. याबाबत आमची चीनशी चर्चा झाली आहे. चीन इराणला शस्त्रे देणार नाही, त्यामुळे आम्ही ते कायमचे उघडण्याचा निर्णय घेतला आहे.’ ट्रंप यांचे हे विधान अशा वेळी आले आहे, जेव्हा होर्मुजमधील अमेरिकेची नाकेबंदी पूर्णपणे अपयशी ठरल्याची बातमी समोर आली होती.
डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या निवेदनात म्हटले की, ‘आता कधीही होर्मुज बंद होण्याची वेळ येणार नाही. हे सर्व देशांसाठी खुले झाले आहे. यामुळे मी खूप आनंदी आहे.’ युद्धविरामाच्या काळात अलीकडेच अशी बातमी आली होती की चीनने इराणला काही शस्त्रे पाठवली आहेत. यावर बोलताना ट्रंप यांनी म्हटले की, मी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना पत्र लिहून शस्त्रे न देण्याची विनंती केली होती, आणि चीनने ती मान्य केली आहे. मी जेव्हा चीनला जाईन, तेव्हा जिनपिंग मला मिठी मारतील. आमचे संबंध चांगले आहेत.’