Hingoli News : हिंगोली जिल्ह्यातील धनगरवाडी गावच्या शिवारात धक्कादायक घटना घडली आहे. एका शेतकऱ्याने जीवन संपवल्याची घटना समोर आली आहे. गोरख पातळे असे या शेतकऱ्याचं नाव आहे. या शेतकऱ्याचा मृतदेह तब्बल तीन तासांपासून झाडाला लटकलेल्या अवस्थेत असल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी धमकावल्याने शेतकऱ्याने जीवन संपल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
या घटनेनंतर मृत शेतकरी गोरख पातळे यांच्या नातेवाईकांनी पोलीस प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. धनगरवाडी परिसरात शेतकऱ्यांच्या नावे विहिरी मंजूर करुन अनुदान लाटल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी उघडकीस आला होता. या प्रकरणाची चौकशी सुरू असताना हिंगोली आर्थिक गुन्हे शाखेकडून गोरख पातळे यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. मात्र, चौकशीदरम्यान पोलिसांनी त्यांना मारहाण केली तसेच धमकावले, असा गंभीर आरोप मयताच्या कुटुंबीयांनी केला आहे. या दबावातूनच त्यांनी आत्महत्या केल्याचा आरोप नातेवाईकांकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, संबंधित पोलीस अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह झाडावरुन खाली उतरवणार नाही, अशी ठाम भूमिका कुटुंबीयांनी घेतली आहे. त्यामुळे घटनास्थळी तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे शासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, एका शेतकऱ्याचा जीव गेल्याने प्रशासनाच्या कामकाजावर गंभीर टीका होत आहे. आता या प्रकरणात पुढे काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.