- डॉ. मालविका तांबे
आयुर्वेद हे हजारो वर्षांपासून सर्वांगीण स्वास्थ्य अर्थात शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्वास्थ्याचा आधारस्तंभ आहे. आयुर्वेदामध्ये असलेली पंचमहाभूत, निसर्ग, वनस्पतीजगत आणि मानव व इतर पशुपक्षी मध्ये असलेलं समन्वय हे बऱ्याचशा नवीन संशोधनांकरता सुद्धा एक महत्त्वाची भूमिका निभावते. आयुर्वेदामध्ये पाचन अग्नि ला दिलेलं महत्त्व हे आजच्या आधुनिक शास्त्राला सुद्धा पटतं आहे. Gut health हा सध्या सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे.
आयुर्वेदाच्या मताने हीच अग्नि शरीरातल्या सगळ्या चयापचय क्रियांना नियंत्रित करते आणि त्याच्यात काही चुका झाल्यास शरीरात जे पित्ताचे व अग्निचे दोष तयार होतात त्यातून वेगवेगळे आजार तयार होतात. तसेच वेगवेगळ्या वनस्पती, खनिज, प्राणी उत्पादन इत्यादींचा शरीराकरता कसा वापर करता येऊ शकतो याचंही प्रचुर ज्ञान आयुर्वेद शास्त्रात आपल्याला सापडते. आपल्या कोशिकांवरती व गुणसूत्रांवरती वातावरणाचा, आपल्या वागणूकीचा, आपल्या आहार विहाराचा फरक पडतो हे आयुर्वेद शास्त्राने फार आधीच सांगितलेलं आहे आणि त्याच्यावरती सुद्धा सध्याच्या काळात बऱ्याच प्रमाणात संशोधन चालू आहे.
आर्टिफिशिअल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता. जरी ती कृत्रिम असली तरी तिला बनवण्याच्या मागे हा मानवी हातच आहे. एवढेच नव्हे तर ती बुद्धिमत्ता कशी विचार करू शकते, कशी शिकू शकते आणि शिकल्यावरती त्याच्यातनं कशी निर्णय घेऊ शकते हे शेवटी मानवी बुद्धीवरती अवलंबून असतं. त्यामुळे जेवढ्या प्रमाणात आपण शुद्ध आणि तात्विक ज्ञान या AI पर्यंत पोचवू शकू तेवढा त्याचा आपल्याला फायदा घेता येऊ शकेल.
आयुर्वेदांमध्ये आरोग्य म्हणजे फक्त रोग नाही अशी परिस्थिती नसते तर रोज व्यवस्थित पोट साफ होणं, लघवी साफ होणं, शरीरामध्ये लघूता वाटणं, आत्मा, इंद्रिय आणि मन प्रसन्न असणं आणि अग्नि आणि दोष हे संतुलित असणं अत्यंत महत्त्वाचं असतं.
आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये जर का योग्य प्रकारचा डेटा फीड केला गेला तर या सगळ्या तत्त्वांवरती एक निकष लावून प्रश्नोत्तरी तयार करण्यात येऊ शकते. बऱ्याचदा असं बघण्यात येतं की जेव्हा कुठलाही व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला उत्तरं देत असतो तेव्हा दोन्ही व्यक्तींची म्हणजे प्रश्न विचारणारा आणि उत्तर देणारा त्यांची प्रवृत्ती किंवा त्यांचा कल जसा असेल तशा प्रकारे उत्तरांचा अर्थ काढला जाऊ शकतो.
जेव्हा एखादं मशीन उत्तरं घेते तेव्हा अशा कुठल्याही प्रकारचा चुकीचा झुकाव आपल्याला टाळता येऊ शकतो. ज्याच्यामुळे उत्तर कदाचित जास्त प्रामाणिक होऊ शकतील. आम्ही जेव्हा आत्मसंतुलनमध्ये प्रत्यक्ष प्रकृती परीक्षण करतो तेव्हा व्यक्तीने दिलेली उत्तरं व कॉम्प्युटराइज्ड फॉर्ममध्ये दिलेली उत्तरं याच्यामध्ये थोडासा फरक पडताना दिसतो. अर्थातच हे सगळे निकष लावल्यानंतर सुद्धा कधीतरी मानवी पैलूने बघण्याची सुद्धा गरज भासू शकेल.
दिनचर्या
आयुर्वेदात दिनचर्या समजवताना बऱ्याचशा गोष्टी सांगितलेल्या आहेत. उदाहरणार्थ, सकाळी लवकर उठावं. उठल्यानंतर ध्यान करावे, व्यायाम करावा, अभ्यास करावा. काही छंद असतील तर त्याकरिता वेळ ठेवावा. अभ्यंग करावे,उद्वर्तन करावे, स्नान करावे या सगळ्याच्या वेळा प्रकृतीप्रमाणे जर का सारणी करून तयार केल्या तर नवीन पिढीला हे सगळं log करून ठेवणं अर्थात नोंद करून ठेवणं शक्य होऊ शकेल. याच्यामुळे आपण किती वेळा दिनचर्येत चुकतो आहोत, त्याच्यामध्ये काय बदल करता येऊ शकतील या सगळ्यांबद्दल जागरूकता वाढू शकेल.
आहार हा आयुर्वेदामध्ये अत्यंत महत्त्वाचा सांगितलेला आहे. त्याच्यामध्येही प्रकृतीनिरूप आहार कसा असावा, किती वेळा खावं, कुठली गोष्ट टाळावी या सगळ्याचा डेटा संकलीत करून ठेवता आला तर होणाऱ्या चुका कमी करता येऊ शकतील. मी बऱ्याचदा जेव्हा रुग्णांना सांगते की तुम्ही आठवड्यातून जितक्याही वेळा चुकीच्या गोष्टी खाल किंवा बाहेरच्या गोष्टी खाल तेव्हा केलेंडर वर त्यादिवशी एक फुली मारा आणि महिन्याच्या शेवटी तुम्ही किती फुल्या दिलेलया आहेत ते मोजा.
म्हणजे तुम्ही स्वतःच्या आरोग्याकरता किती प्रयत्न करतात आहात हे तुम्हाला स्वतः प्रत्यक्ष लक्षात येईल. ही पद्धत पाळायला सुरू केल्या केल्या त्यांच्या होणाऱ्या चुका हळूहळू कमी होतात असा रुग्णांचा अनुभव आहे. त्यामुळे AI च्या माध्यमातून जर का आपल्याला आपल्या आहाराचा तक्ता मांडून ठेवता आला तर त्याचा आपल्याला नक्कीच उपयोग होईल.
एवढेच नव्हे तर आहार सात्त्विक आहे का, पचायला सोपा आहे का, पोषक आहे का याच्याकडेही आपल्याला लक्ष ठेवता येऊ शकेल. उदाहरणार्थ, एखादी गोष्ट खाल्ल्यावरती जर का पोटात त्रास झाला किंवा पोट बिघडले तर पुढच्या वेळेला परत तोच आहार पदार्थ खाऊन तसाच त्रास होतो आहे का हे आपल्याला AI च्या माध्यमातून सहज कळू शकेल.
आयुर्वेदाच्या मताने दूध, तूप, बदाम, पंचामृत, मुगाचा लाडू, अश्वगंधा, कवचबीज, सुवर्ण, ब्राह्मी, पिंपळी इत्यादीसारखे वेगवेगळे रसायन आणि आहार पदार्थ नियमित घ्यायला सांगितलेले आहेत. हे आहार पदार्थ नियमित घेतल्याने शरीरावरती काय बदल घडतात आहेत हेही डेटा गोळा करणं सोपं जाऊ शकेल.
एकूणच ही सगळी माहिती जर का आपल्याला एका ठिकाणी साठवता आली तर आयुर्वेदाच्या हिशोबाने प्रकृती अनुरूप व्यक्तिगत स्तरावरती जे चिकित्सा केली जाते त्याचं प्लॅनिंग जास्त व्यवस्थित होऊ शकेल.
आजारांना प्रतिबंध आणि लवकर निदान
‘आजार होऊच नये’ यावर आयुर्वेदाचा मोठा भर आहे. वात, पित्त आणि कफ या त्रिदोषांची लक्षणे आणि आजार बळावण्याआधीची अवस्था (पूर्वरूप, संप्राप्ती) AI च्या डेटाबेसमध्ये नोंदवल्यास, आजार उद््भवण्यापूर्वीच त्याचे अचूक निदान करणे शक्य होईल. कुटुंबातील अानुवांशिक आजारांची शक्यता ओळखून ‘निदान परिवर्जन’ (आजाराच्या कारणांचा त्याग) करण्यासाठी AI अचूक मार्गदर्शन करू शकते, तसेच आयुर्वेदातील नाडी, दर्शन, प्रश्न तसेच मूत्र, मल आणि जिव्हा परीक्षणाचे निष्कर्ष एका प्रणालीत साठवल्यास निदानाची पातळी अधिक उंचावेल.
वनस्पती ओळख व संशोधनाला गती
औषधी वनस्पतींची छायाचित्रे आणि गुणधर्मांची सविस्तर माहिती AI प्रणालीत एकत्र केल्यास, वनस्पतींची अचूक ओळख पटवणे आणि त्यांची गुणवत्ता तपासणे अत्यंत सोपे होईल. आजमितीस आयुर्वेदाच्या सर्व प्राचीन संहिता ‘डिजिटाइज’ (Digitize) झाल्या आहेत. त्यामुळे पूर्वी संदर्भ शोधण्यासाठी लागणारा वेळ आता अक्षरशः काही मिनिटांवर आला आहे. ‘आयुर्जीनोमिक्स’ (Ayurgenomics), नवीन औषधनिर्मिती, वनस्पतींच्या प्रभावाचा अभ्यास आणि पंचकर्माचे शरीरावरील परिणाम अभ्यासण्यासाठी AI हे एक अत्यंत प्रभावी साधन ठरत आहे.
मर्यादित वापर
AI चा वापर करत असताना आपल्याला मानवी बुद्धीचं कमी आकलन करून चालणार नाही. बऱ्याचशा गोष्टी अशाही असतात की जिथे ह्युमन टच अर्थात मानवी मूल्य मानवी परीक्षण हे अत्यंत गरजेचं असतं. त्यामुळे AI चा वापर करत असताना आपल्याला त्याची मर्यादा पण लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. वैद्यकीय सल्ल्याकरता किंवा औषधांकरता AI ची मदत न घेता शास्त्रीय स्तरावरती आयुर्वेदमधे AI ची मदत घेऊन पुढे जाणं वैद्यांना कसं शक्य होऊ शकेल हे बघणं आत्ता काळाची गरज आहे.