पुणे : कथित प्रेमसंबंधांच्या संशयावरून एका ३९ वर्षीय महिलेचा निर्घृणपणे खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना चंदननगर परिसरात शुक्रवारी (ता. १७) उघडकीस आली. याप्रकरणी चंदननगर पोलिसांसह गुन्हे शाखेने अवघ्या सहा तासांत वकील, त्याची पत्नी आणि मुलगी या तिघा आरोपींना अटक केली आहे.
पूनम दिनेश मून (वय ३९, रा. गणेशनगर, येरवडा) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचे पती दिनेश उद्धवराव मून (वय ३९) यांनी चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून ॲड. संजय दत्तात्रेय सावंत, त्यांची पत्नी स्वाती संजय सावंत आणि त्यांची मुलगी या तिघा संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पूनम मून आणि संजय सावंत यांच्यात प्रेमसंबंध असल्याचा संशय सावंत यांच्या कुटुंबाला होता. याच संशयातून ॲड. सावंत याची पत्नी स्वाती आणि मुलीने संगनमत करून पूनमच्या खुनाचा कट रचला. चंदननगर येथील कार्यालयात आरोपींनी पूनम यांचे पाय दोरीने बांधून बॅटने आणि धारदार शस्त्राने वार करून खून केला. या कटात वकील संजय सावंत याचाही सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने त्याला अटक केल्याचे पोलिसांनी सांगितले.
याबाबत माहिती मिळताच चंदननगर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संजय सावंत आणि त्याच्या मुलीला ताब्यात घेतले. तर, गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने स्वाती सावंत हिला ताब्यात घेतले. पोलिस आयुक्त अमितेश कुमार, पोलिस सहआयुक्त रंजन कुमार शर्मा, अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील, पोलिस उपायुक्त सोमय मुंडे यांच्या सूचनेनुसार वरिष्ठ निरीक्षक नीलेश बडाख आणि गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक राम राजमाने यांच्या पथकाने ही कारवाई केली. पुढील तपास लोणीकंद विभागाच्या सहाय्यक आयुक्त नूतन पवार करत आहेत.