- अशोक खानापुरे, २१ ब नंदीकेश नगर शेळगी, सोलापूर.
बसवेश्वरांच्या विचारांची आजही गरज आहे. संपूर्ण समाजाला एकसंध व सुखी करण्याचा एकमेव उपाय म्हणजे बसवेश्वरांच्या सामाजिक क्रांतीचे विचार आचरणात आणणे. अशा या थोर सामाजिक क्रांतिकारकाचा परिचय करून देणारा हा लेख...
पृथ्वीतलावर ज्या ज्या वेळी अन्याय व अत्याचार वाढला, त्या त्या वेळी महान संतांचा उदय झाला. बाराव्या शतकात कर्मकांडाला ऊत आला होता. अस्पृश्यांना भक्तीचे द्वार बंद होते. पुरोहितांचा अहंकार वाढला, कर्मकांड बोकाळले. स्पृश्य-अस्पृश्य व गरीब-श्रीमंत भेद पराकोटीला गेले. भक्तीचा खरा मार्ग सोडून भक्तीचे अवडंबर वाढले. धर्माच्या नावावर शोषण प्रवृत्ती वाढली. माणुसकीचा लोप होऊन अधर्माचा अंधकार वाढला. नैतिकतेचे अधःपतन झाले. स्त्रियांना स्वातंत्र्य नव्हते, स्त्रियांकडे कुदृष्टीने पाहत होते. मद्य व जुगाराचे प्रस्थ वाढले. लोकांत चोरी, हत्या, असत्य भाषण, क्रोध, तिरस्कार, आत्मस्तुती, परनिंदा, द्रव्याचा लोभ, व्यभिचार व अनैतिक आचरण वाढले. पुण्यकर्म व सत्कर्म करण्याची लाज वाटू लागली. पाप व दुष्कर्म करण्यात प्रौढी वाढली. अंधश्रद्धा मोठ्या प्रमाणावर बोकाळली. अस्पृश्यांचे जीवन कष्टप्रद होते. आर्थिक विषमता वाढली. वर्णव्यवस्थेचे वर्चस्व होते. धर्माला ग्लानी आली होती.
यावेळी लोकांना भक्तीचा खरा मार्ग व धर्माचा खरा अर्थ सांगणारे महात्मा बसवेश्वरांचा उदय झाला.
वर्णव्यवस्थेवर प्रहार करून भक्तीची कवाडे अस्पृश्यांना खुले करणारे महात्मा बसवेश्वर क्रांतिकारक होते. प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन त्याग करून लोकांना भक्तीचा सोपा व खरा मार्ग दाखविला. बसवेश्वरांनी क्रांतीची मशाल घेऊन अंधकारात चाचपडणाऱ्यांना धर्माचा नवा प्रकाश दाखविला. मुलांचे पाय पाळण्यात दिसतात असे म्हणतात, त्याप्रमाणे बसवेश्वरांची रूढी परंपरा व अनिष्ट चालीरिती मोडीत काढण्याची व त्याविरुद्ध बंड करण्याची प्रवृत्ती बालपणीच दिसली.
बाराव्या शतकात अस्पृश्यांना कोणीही शिवत नसत. बसवेश्वरांनी अस्पृश्य मुलाला बुडताना वाचवले. उपनयन संस्काराला विरोध केला, त्यामुळे कर्मठ सांप्रदायिक पुरोहित वर्ग संतापला. त्याला आईवडिलांनी समजावून सांगितले, पण त्यांनी आईवडिलांचे ऐकले नाही. अशा प्रकारे बालपणीच अनिष्ट रूढीविरुद्ध बंडाचा झेंडा रोवला, सामाजिक क्रांतीची मशाल पेटविली.
बसवेश्वरांनी संस्कृत व कन्नडवर प्रभुत्व मिळविले. दर्शन, वेद, पुराण, उपनिषदांचे अध्ययन चिंतन केले. प्रफुल्लित चेहरा, सतेज नेत्रद्वय, गौरवर्ण, शरीरसौष्ठव, प्रेमळ व विनम्र स्वभाव, अलौकिक बुद्धिमत्ता, अचाट स्मरणशक्ती, प्रसन्न व्यक्तिमत्व, आकर्षक व लाघवी बोलणे, निर्गर्वी व अहंकाररहित वागणे, हे बसवेश्वरांचे वैशिष्ट्य होते. सामाजिक क्रांतीसाठी आवश्यक असलेले व्यक्तिमत्त्व बसवेश्वराजवळ होते. रंजलेल्या गांजलेल्या समाजाला बळ, प्रेम व दिलासा देणारे बसवेश्वर हे असामान्य व अद्वितीय होते.
सामाजिक क्रांतीच्या ध्येयाने प्रेरित झालेल्या बसवेश्वरांनी लग्नास नकार दिला. कारण सांसारिक मोह पाशात अडकून राहिलो तर सामाजिक क्रांतीचे ध्येय स्वप्न ठरेल अशी भीती त्यांना होती. मानवाचे कल्याण, त्यांच्या आत्मोद्धाराची तळमळ व सामान्याला सन्मार्गी लावण्याची प्रबळ इच्छा होती. वडीलधाऱ्यांच्या आज्ञेचे पालन हे कर्तव्य आहे, असे मानून त्यांनी लग्न केले. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे त्याच्या पत्नीचे मोठे योगदान असते, त्याप्रमाणे बसवेश्वरांच्या प्रत्येक कार्यात त्यांची पहिली पत्नी गंगांबिकेने तन-मन-धनाने समर्पित केले. बसवेश्वरांची दुसरी पत्नी नीललोधना ऊर्फ नीलांबिकेने आलेल्या संपत्तीतून ग्रंथालय, वचन भांडार आणि अनुभव मंटपाची निर्मिती केली. सामाजिक क्रांतीच्या उच्च ध्येयासाठी ऐहिक सुखाला तिलांजली देणारे बसवेश्वर व त्यांच्या पत्नीचा आदर्श अलौकिक आहे. संपत्तीचा उपयोग भोग विलास व चंगळवादासाठी न करता सामाजिक क्रांतीसाठी व मानवाच्या कल्याणासाठी खर्च करणारे धन्य ते गंगांबिका व नीलांबिका.
धन ऐश्वर्य, उच्चपद, मान-सन्मान, प्रतिष्ठा, सुंदर पत्नी, वैभवशाहीचा त्याग करून बसवेश्वरांनी अन्याय, अधर्म, अत्याचार, वर्णव्यवस्था, जातिभेदाचे उच्चाटन करण्यासाठी जीवन व्यतीत केले. अस्पृश्यांना न्याय देणारे बसवेश्वर हे पहिले क्रांतीकारक आहेत. आंतरजातीय विवाहाचे समर्थन केले. जाती व्यवस्था नष्ट करण्यासाठी बसवेश्वरांचे शिष्य मधूवरस (ब्राह्मण)ची मुलगी कलावतीचा विवाह हरळय्याचा (चांभार) मुलगा शीलवंताशी लावून दिला. याविरुद्ध रुढीवादी लोकांनी आवाज उठवला. बसवेश्वरांविरुद्ध बिज्जळ राजापुढे अनेक आरोप केले. त्यांची ही कृती म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखी होती.
बसवेश्वरांनी नवसमाज निर्मिती व नवविचारावर चर्चा घडवण्यासाठी कल्याण येथे ‘अनुभव मंटपाची’ स्थापना केली. तेथे अनेक शरण येत. सर्व जातींसाठी अनुभव मंटप खुले होते. तिथे स्त्रियांनाही परवानगी होती. तेथे ७०० शिवशरण व ७० शिवशरणी एकाच वेळी धर्मावर विचार विमर्श करत होते. यावरूनच बसवेश्वरांचे विशाल व व्यापक सामाजिक क्रांतीची प्रचिती येते. अनुभव मंटप म्हणजे बसवेश्वरांची सामाजिक क्रांतीची प्रयोगशाळा होती. अनुभव मंटपात भारतातील विविध राज्यांतून लोक स्वेच्छेने येत. अल्लमप्रभू, मडिवाळ माचय्या, अंबिगर चौडय्या, मादार चन्नय्या, भद्रनायक चामराय, राजकुमारी बोतादेवी, मरूळ शंकर देव गांधार (अफगाणिस्तान) इ. अनेकजण अनुभव मंटपात येऊन धार्मिक कार्यात व चर्चेत भाग घेत. अनुभव मंटप अद्भुत, अपूर्व व असाधारण धर्म संसद होते. अनुभव मंटपाचा सारा खर्च श्रमाच्या पैशातून केला जात असे. अनुभव मंटपाच्या संदर्भात शिवगण महादेव रचित ‘शून्य संपादन’ ग्रंथ महत्त्वाचा आहे. अनुभव मंटपात समता, स्वतंत्रता, बंधुभाव आणि एकता या मूल्यांची जोपासना करत.
बसवेश्वरांचे स्त्रियांविषयी उदारमतवादी धोरण होते. हे त्यांच्या वचनातून दिसून येते. त्याविषयी वचन खालीलप्रमाणे आहे:
परस्त्रीला कुदृष्टीने पुन्हा पुन्हा पाहणे, त्याचे स्मरण करणे घोर नरक आहे. (वचन क्र. ७५५)
स्त्रियांना पुरुषाप्रमाणे समान अधिकार दिले. स्त्रिया क्रूर बंधनात अडकल्या होत्या, त्यांना गुलामाप्रमाणे वागणूक मिळत असे, त्यांची मुक्तता बसवेश्वरांनी केली. अशा प्रकारे बसवेश्वर स्त्रीकुलोद्धारक होते. बसवेश्वरांनी वेश्याविषयी विचार करून यास परिहार शोधण्याचा प्रयत्न केला. वेश्या महिलांच्या उद्धारासाठी त्यांनी योजना आखली, त्यांचे जीवन सुधारण्यासाठी सत्संग व परिवर्तन झालेल्यांना अनुभव मंटपात मानाचे स्थान दिले. बसवेश्वर पतितोद्धारक होते.
बसवेश्वर हे दलितांचे कैवारी व दलित उद्धारक होते हे खालील त्यांच्या वचनावरून दिसून येते:
अप्पनु नम्म मादार चन्नय्या, बोप्पनु नम्म डोहार कक्कय्या- (वचन क्र. ३४८)
अनुवाद : वडील माझे मांग चन्नय्या, आजोबा माझे ढोर कक्कय्या, भाऊ माझा किन्नरी बोम्मण्णा, ऐसे मानल्याकारणे कुडलसंगमदेवा मी झालो सुखी.
अशा प्रकारे दलितांना एवढे उच्च स्थान देणारे बसवेश्वर होते. बसवेश्वरांचे अनेक शिष्य मागासवर्गीय होते. आंतरजातीय विवाह लावले, प्रस्थापितांविरुद्ध बंड केले. दलितांना लिंग पूजेचा मान दिला. दलितांना ‘देह हेच देवालय आहे’ आणि ‘दलितांना कोणीही दुखवू नये’ असे सांगितले.
बसवेश्वर मानवतावादी होते. पापी, वेश्या, कथित खालच्या वर्गातील दुर्लक्षित उपेक्षितांविषयी दाखवलेली दया अपार आहे. पापी, कोपी, व्यसनी, दारुबाज, खुनी या सर्वांना प्रेमाने सुधारण्याचे प्रयत्न केले. बसवेश्वरांनी देवलोक व मृत्युलोकाविषयी कल्पना अतिशय मार्मिकपणे मांडली आहे:
देवलोक मृत्यूलोक नसे हो अन्यठायी
सत्यवचनी साठले देवलोक
मिथ्य वदणे हाचि मृत्युलोक
आचाराठायी स्वर्ग
अनाचारचि नरक, अहो म्हणणे स्वर्ग अरे म्हणणे नरक. (व.क्र. २३९)
माणसाने कसे वागावे, त्याचे आचरण कसे असावे याचे सुंदर विश्लेषण बसवेश्वरांनी वरील वचनात केले आहे. समाजातील दुष्ट व पापी लोक भक्तीचे ढोंग करतात, तेव्हा त्यावर बसवेश्वरांनी या ढोंगी लोकांना आपल्या वचनात ठणकावून सांगितले :
चोरी करू नका, हत्या करू नका
खोटे बोलू नका, क्रोध करू नका
नको तिरस्कार, नको आत्मस्तुती
करू नका परनिंदा
हेच अंतरंग व बहिरंग शुद्धी आहे (व.क्र. २३५)
स्वतःचे आचरण व कृती शुद्ध असल्याशिवाय परमेश्वर प्राप्ती होत नाही, असे बसवेश्वरांनी सांगितले. त्यांनी लिहिलेले वचन म्हणजे ‘अमृतकलश’ आहे. या कलशात सामाजिक क्रांतीचे अमृत आहे.
बसवेश्वर हे समाजवादी होते. त्यांनी श्रमाला महत्त्व दिले. ‘कायकवे कैलास’ हा महामंत्र दिला. कायक (श्रम) करूनच आपला चरितार्थ चालवावा, असे सांगितले. श्रमाला प्रतिष्ठा बसवेश्वरांनी दिली.
आधुनिक सुधारणेचे जनक महात्मा बसवेश्वर आहेत. सामाजिक क्रांतीचा पाया बसवेश्वरांनी घातला. क्रांतिकारकांना ज्याप्रमाणे अनेक यातना भोगावे लागतात, त्याप्रमाणे बसवेश्वरांना कर्मठ, रुढीवादी, पाखंडी व जातीयवादी लोकांनी त्रास दिला. या त्रासाला न भिता त्यांनी क्रांतीचा पताका फडकवला. या महान सामाजिक क्रांतिकारकाचा संपूर्ण भारतात गौरवपूर्ण उल्लेख केला जातो.