महात्मा बसवण्णांची पाच नीतिमूल्ये
esakal April 19, 2026 12:45 AM

- राज ब. जुबरे, संचालक, महाराष्ट्र बसव परिषद

महात्मा बसवण्णांनी सांगितलेल्या पाच नीतिमूल्यांना लिंगायत तत्वज्ञानात ‘पंचाचार’ असे म्हटले जाते. पंचाचारामध्ये लिंगाचार, सदाचार, शिवाचार, भृत्याचार आणि गणाचार हे पाच आचार येतात. पंचाचार म्हणजे, मनातील आंतरिक क्रिया शुद्ध करून, सुजाणपणे कर्मयोगाला प्रेरित करणे होय. लिंगाचाराने तन शुद्ध होते. सदाचाराने धन शुद्ध होते. शिवाचाराने मन शुद्ध होते. गणाचाराने क्रिया शुद्ध होते आणि भृत्याचाराने वाणी शुद्ध होते. हे पाच आचार म्हणजेच पाच नीतिमूल्ये होत. यांचा संक्षिप्त परिचय पाहू या.

लिंगाचार :

लिंगाचार हा धार्मिक नैतिकतेचा संदेश देणारा आचार आहे. लिंगाचार म्हणजे निराकार परमेश्वर (लिंग) हेच परमत्व जाणून, पवित्रतेच्या साधनेद्वारे आध्यात्मिक प्रगती साधणे हा लिंगाचार प्रतिपादनामागील उद्देश आहे. इष्टलिंग सदैव अंगावर धारण करायचे असल्यामुळे त्याच्या उपासनेसाठी विशेष स्थळ, काळ, प्रदेश यांचे बंधन नाही. ही साधना करण्यासाठी विशिष्ट जात, धर्म, पंथ, वर्ण, लिंग यांची मर्यादा नाही. लिंगाचार व्यक्तीस धार्मिक स्वातंत्र्य व समता प्रदान करतो.

सदाचार :

सदाचार हा आर्थिक नैतिकता व समता प्रतिपादन करणारा आचार आहे. सदाचार म्हणजे सत्य-शुद्ध कायकातून प्राप्त केलेल्या धनात आत्मकल्याण, तसेच, दासोहाने समाजोपयोगी कार्यातून लोककल्याण साधत नैतिक जीवन जगणे होय. कायक अर्थात सत्य-शुद्ध परिश्रम श्रेष्ठ-कनिष्ठ असा भेदभाव नाही. विशिष्ट श्रम विशिष्ट जातीतील लोकांनीच करावेत असे बंधन नाही. त्यामुळे श्रमाधारित जातिभेद इथे धरला नाही. ऐतखाऊपणा व शोषणवृत्ती सदाचार कडून विरोध केला जातो. आपल्या उदरनिर्वाहासाठी प्रत्येकाने कष्ट केले पाहिजेत. प्रत्येकास कायक, म्हणजेच सत्य-शुद्ध श्रमाचे महत्त्व कळले तर, चोरी, अन्याय, संपत्तीचा हव्यासातून होणारे गुन्हे, शोषण अशा अनैतिक आचरणास आळा बसेल. वासनांमुळे संग्रह प्रवृत्ती नष्ट होईल. प्रामाणिकपणे वेळेवर आयकर भरल्यास राष्ट्र समृद्ध होईल. सदाचारात आर्थिक नैतिकता व समतेचा आग्रह आहे.

शिवाचार :

शिवाचार सामाजिक समतेचे प्रतिपादन करतो. वर्णभेद, वर्गभेद, जातिभेद, कुळ-गोत्र भेद, लिंगभेद न मानता सर्व मानव एकाच परमात्म्याची लेकरं आहेत, असा समतेचा दृष्टिकोन बाळगणे म्हणजे शिवाचार होय. सर्व इष्टलिंगधारी समान असल्याने त्यांच्यात रोटी-बेटी व्यवहार झाले पाहिजेत. जातिभेद, अस्पृश्यता, स्त्री-पुरुष भेदभाव अनुसरणे म्हणजे, त्या परमात्म्याचा अपमान होय. त्यामुळे अशा अनिष्ट रूढी-परंपरांना तिलांजली देऊन सर्वसमावेशकतेचे तत्त्व आचरणात आणले पाहिजे. स्वधर्मनिष्ठा आणि परधर्म सहिष्णुता असली पाहिजे. शिवाचार एकवचनी शांतीत नाही, तर समविचारी लोकांनी सहजीवन केले पाहिजे; सहजीवनाबरोबरच रक्तसंबंधी व्यवहाराचे आचरण केले पाहिजे हा बसवण्णांचा आग्रह आहे. ‘हा आमचा, हा आमचा, हा आमचा’ ही बसवण्णांची शिवाचाराची साक्ष आहे. शिवाचार हा सामाजिक नैतिकता शिकवितो.

गणाचार :

गणाचार म्हणजे, विषमता, शोषण, अनैतिकता, क्रौर्य, हिंसाचार, भ्रष्टाचार, अन्याय इत्यादी आपल्या अंतर्गत, तसेच, बाह्यरूपात असलेल्या दुष्ट वृत्ती-प्रवृत्तींचा प्रतिकार करणे होय. मानवतावादी, कल्याणकारी मूल्यांच्या प्रसारासाठी तळमळीने राहून संघर्ष करणे. हा संघर्ष अहिंसक, शांततामय असला पाहिजे. समाजातील अनिष्ट रूढी, परंपरांच्या विरोधात संघर्ष करणे, अंधश्रद्धा व कर्मकांड संपुष्टात आणण्यासाठी जाणिवपूर्वक प्रयत्न करणे, समाज व राष्ट्राच्या प्रगतीसाठी कटिबद्ध राहणे हा सुद्धा गणाचार होय. लिंगाचार, सदाचार आणि शिवाचार यांच्या रक्षणासाठी व संवर्धनासाठी गणाचार फार महत्त्वाची भूमिका पार पाडतो. गणाचाराचा अंतर्भाव सार्वभौम नैतिकतेत करता येईल.

भृत्याचार :

भृत्याचार म्हणजे विनय, नम्रताजन्य सेवाभाव होय. व्यक्तीपेक्षा देश मोठा आहे, व्यक्तीपेक्षा समाज श्रेष्ठ आहे, या विशाल भावनेने विनम्र होऊन सर्व प्राणिमात्रांप्रती दयाभाव वाढवून सेवा करणे म्हणजे भृत्याचार होय. सत्ता, संपत्ती, प्रतिष्ठा यांचा अहंकार न बाळगता हे सर्व परमेश्वराची कृपा म्हणून समर्पित वृत्तीने, विनय भावाने राहणे म्हणजेच भृत्याचार होय. विनयाने झालेले सामाजिक परिवर्तन हे दीर्घकाल टिकणारे असते. विनयाने सामाजिक सामंजस्य, परस्पर सहकार्याची भावना वाढीस लागते. संयमाने शांती व समाधान प्राप्त होते. एकूणच, भृत्याचारात वैयक्तिक नैतिकतेवर अधिक भर देण्यात आला आहे. महात्मा बसवण्णांनी दिलेल्या या पाच नीतिमूल्यांच्या आचरणातून व्यक्ती, कुटुंब, समाज नैतिक बनवून बलशाली भारत निर्माण करू या.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.