>> रविप्रकाश कुलकर्णी
खरे तर हल्ली प्रत्येक दिवस कुठला ना कुठला दिवस असतोच. त्याचा इव्हेंट असतो. इव्हेंट म्हटलं की सेलिब्रेशन आलंच… हे सगळं सांगायचे कारण येणारा 23 एप्रिल म्हणजेच जागतिक पुस्तक दिन. हा दिवसदेखील बऱ्याच जणांच्या लक्षात येतो. कारण आमच्या कॅलेंडरवर तसं छापलेलं आहे म्हणून! अर्थात ज्यांना वाचन केलं नाही तर आंघोळ न केल्यासारखं वाटतं, ते याला अपवाद. कारण त्यांच्या लेखी नेहमीच ग्रंथ वाचन दिन असतो.
इथे थोडा खुलासा करायला हवा. आता नेमकं आठवत नाही, पण गदिमा, सी. रामचंद्र , वामनराव चोरघडे अशापैकी कुणाची तरी छापून आलेली पत्रं वाचनात आली. त्यात उल्लेख दिसला ‘बऱ्याच दिवसांत ग्रंथ वाचनाचा कार्यक्रम झाला नाही.’ ते वाचून वाटलं ही मंडळी त्या वेळी सामूहिकरीत्या वाचन करत असतं की काय?
पण नंतर यांच्यापैकीच कुणाच्या तरी पुस्तकात दिसलं, ती पण एक हकिकतच. एका वेगळ्या पुस्तकाची. तेव्हा वेगळ्या अर्थाने या मंडळीत शब्द रूढ झाला, ग्रंथ वाचन. पुस्तक संग्राहकाकडे असा आगळा ऐवज नक्कीच सापडतो.
हे लिहीत असतानाच कवी संदेश ढगे याचा ताजा कवितासंग्रह ‘नवा संग्रह’ हाती आला. त्यात एक कविता आहे,
कवीचा थांबला लिहिता हात कित्येक दिवस
मग त्यानेच विकायला काढली
जपून ठेवलेली घुसमट भंगारात
भंगारवाल्याने ओळखले कवीला
एके दिवशी मी तुमच्या कवितेत शिरलो साहेब.
तेव्हा मला कळले
आपण पुन्हा भेटू
शेवटी, जिवंत लोकांचे जीवन
आमच्याकडे येतो
हे कवीचे शब्द हे साक्षात्कारीच म्हणायचे.
पुस्तकाबद्दलचं प्रेम, आस्था आणि काळजी खरे तर आमच्या परंपरेचा भाग आहे. दसऱ्याला सरस्वती पूजन, गुढीपाडव्याला पंचांग वाचन हा त्याचाच भाग ना? पुस्तकासंबंधित कितीतरी सुभाषितं आहेत. पण आम्ही सगळंच विसरायला निघालो त्याला कोण काय करणार?
मात्र युनेस्कोने याबाबत पुढाकार घेतल्याने या मोहिमेला वेग आला. ‘सफदर हाश्मीची किताबे कुछ कहना चाहती है’ या कवितेपासून अनेकांनी पुस्तकांबाबत कविता लिहिल्या. त्यात सतीश काळसेकरांची कविता वेधक होती. ‘…तरीही पुस्तके भाकरीसाठी विकता येत नाहीत’ या कवितेचा त्यांना उत्तरार्ध लिहायचा होता, पण त्यांच्याने ते झालं नाही. पण तो अंदाज संदेश ढगे यांना आला का? ते लिहितात-
मोबाईल विकत घेतल्याचं कौतुक सांगताच
काळसेकर उसळून म्हणाला
आता तू मेला आहेस!
तू विकत घेतली आहेस घातक काळी बाहुली
आता येतील तुझ्यात वस्तीला
व्हाटस्आप, फेसबुक, इन्स्टाग्राम वगैरे
तुझ्या विश्वशोधाच्या तल्लीनतेचं
होईल यथासांग वाटोळे
वाचन मिरवणारा मी
माझे बघ काय झालं?
एक वेळ पी
एकांतात का होईना
तुझा तू राहशील
मित्रा, पुन्हा निरक्षर झालास रे
यंत्र कधी धारण करेल का कागदाचं शरीर
आणि इतकं बोलून
एखाद्या देवदूतासारखा काळसेकर
अंतर्धान पावला
त्यानंतर कवी म्हणतो तो विशेष आहे-
मीही मग
पुस्तकांच्या गुहेत केला अद्भुत प्रयोग
फुगलेली बॅटरी भिरकावून चपटा मोबाईल
वापरला बुकमार्क म्हणून
पण पुन्हा निरक्षर झालो नाही
कवी ढगे यांच भाग्य थोर म्हणून त्यांची सुटका झाली, पण बहुसंख्यांचं काय? हा पाव्यूह कसा भेदायचा? जागतिक पुस्तक दिनानिमित्त एवढा विचार झाला तरी पुष्कळ.





