गुजरातचा विजयरथ मुंबई रोखणार? अहमदाबादमध्ये आज लढत; सूर्यकुमार यादव, तिलक वर्माच्या फलंदाजी फॉर्मची चिंता, कशी असेल Playing XI
esakal April 20, 2026 01:45 PM

अहमदाबाद : मुंबई इंडियन्स-गुजरात टायटन्स यांच्यामध्ये आयपीएलमधील साखळी फेरीचा सामना आज (ता. २०) अहमदाबादमध्ये रंगणार आहे. गुजरात संघाने पहिल्या दोन पराभवांनंतर सलग तीन लढतींमध्ये विजय मिळवत यंदाच्या मोसमात झोकात पुनरागमन केले आहे. मुंबई संघाने सलामीच्या लढतीत विजय मिळवला खरा, पण त्यानंतर सलग चार लढतींत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. आता गुजरातचा विजयरथ रोखण्याचे काम मुंबईला करावे लागणार आहे. तसेच या स्पर्धेतील आव्हान कायम राखण्यासाठी मुंबईला प्रयत्नांची शिकस्त करावी लागेल.

हार्दिक पंड्याच्यानेतृत्वात मुंबई संघाने सलामीच्या लढतीत दमदार विजय मिळवला, पण त्यानंतर सलग चार लढतींत सपाटून मार खावा लागला आहे. अनुभवी रोहित शर्माला दुखापत झाली आहे. मागील सामन्यात तो खेळू शकला नाही. रायन रिकल्टनच्या फलंदाजी फॉर्ममध्ये सातत्याचा अभाव दिसून येत आहे.

IPL 2026, LSG vs GT: प्रसिद्ध कृष्णाचा तिखट माऱ्याने लखनौची फलंदाजी गडबडली; गिलच्या गुजरातसमोर सोपं लक्ष्य

जसप्रीत बुमरा याला पहिल्या पाच सामन्यांमध्ये एकही फलंदाज बाद करता आलेला नाही. त्याचे अपयश बोचणी देणारे ठरत आहे. दीपक चहर, ट्रेंट बोल्ट या अनुभवी वेगवान गोलंदाजांकडूनही प्रभावी गोलंदाजी झालेली नाही. मयांक मार्कंडे, अल्लाह गझनफर यांच्याकडूनही निराशाच झाली आहे. मुंबईच्या गोलंदाजांना गुजरातच्या फलंदाजांना रोखण्याचे काम करावे लागणार आहे. सध्या तरी हे खडतर दिसून येत आहे.

गिल, बटलरचा प्रभाव

गुजरातचे पहिल्या तीन क्रमांकावरील फलंदाज छान फलंदाजी करताना दिसत आहेत. कर्णधार शुभमन गिल, साई सुदर्शन व जॉस बटलर यांच्या बॅटमधून धावा निघत आहेत. मात्र, ग्लेन फिलिप्स, वॉशिंग्टन सुंदर व राहुल तेवतिया या मधल्या फळीतील फलंदाजांकडून अपेक्षा पूर्ण झालेल्या नाहीत. अर्थात त्यांच्या खांद्यावर अद्याप मोठी जबाबदारी आलेली नाही. निर्णायक क्षणी त्यांना आपला खेळ उंचवावा लागणार आहे.

Jasprit Bumrah: रिलॅक्स, मी आहे... टेन्शनमध्ये दिसणाऱ्या कोचला बुमराहचा इशारा; Video व्हायरल गोलंदाजीत सातत्य हवे

गुजरातच्या गोलंदाजी विभागात सातत्यपूर्ण खेळाचा अभाव दिसून येत आहे. कागिसो रबाडा व मोहम्मद सिराज या दोन वेगवान गोलंदाजांकडून अधूनमधून छान गोलंदाजी करण्यात येत आहे. दोघांच्या कामगिरीत सातत्य दिसून यायला हवे. प्रसिध कृष्णा व राशीद खान यांच्याकडेही अनुभवाची कमतरता नाही, पण दबावाखाली या दोघांनीही आपल्या खेळाचा स्तर उंचावण्याची गरज आहे. कोलकताविरुद्धच्या विजयानंतर मात्र गुजरातच्या गोलंदाजांचा आत्मविश्वास नक्कीच उंचावला असेल. आता हे गोलंदाज मैदानात कशी कामगिरी करतात, हे पाहणे रंजक ठरणार आहे.

संभावित प्लेइंग इलेव्हन

गुजरात टायटन्स: साई सुदर्शन, शुभमन गिल (कर्णधार), जोस बटलर (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, ग्लेन फिलिप्स, राहुल तेवतिया, राशिद खान, कगिसो रबाडा, अशोक शर्मा, मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा. इम्पॅक्ट प्लेयर- शाहरुख खान.

मुंबई इंडियन्स: रायन रिकेल्टन (यष्टीरक्षक), क्विंटन डी कॉक, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या (कर्णधार), शेरफन रदरफोर्ड, नमन धीर, मयंक रावत, शार्दूल ठाकूर, दीपक चहर आणि जसप्रीत बुमराह.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.