'नारीशक्ती'वरून सत्ताधाऱ्यांमध्ये वाद
esakal April 20, 2026 10:45 PM

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २० : देशाच्या संसदेत ‘नारीशक्ती वंदन’ विधेयक नामंजूर झाल्याच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत राजकीय वातावरण तापल्याचे चित्र सोमवारी (ता. २०) पाहायला मिळाले. या मुद्द्यावरून सभा पूर्ण दिवस तहकूब करण्याचा प्रस्ताव भाजपच्या नगरसेवकांनी मांडला होता. मात्र, महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी हा प्रस्ताव पटलावर न घेतल्याने भाजप नगरसेवक संतप्त झाले आणि त्यांनी प्रशासनाविरोधात निषेध नोंदविला.

ठाणे महापालिका निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेच्या शिंदे गटाने युतीत निवडणूक लढवून सत्ता स्थापन केली असली तरी स्थानिक पातळीवर दोन्ही पक्षांमध्ये मतभेद कायम असल्याचे वारंवार दिसून येत आहे. पहिल्याच सर्वसाधारण सभेतही दोन्ही पक्षांमध्ये वाद झाले होते, तर सोमवारी झालेल्या सभेनंतरही तेच चित्र पुन्हा पाहायला मिळाले. नारीशक्ती वंदन अधिनियमाला देशातील विरोधी पक्षांनी विरोध करून हे विधेयक नामंजूर केले. काँग्रेस आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्या विरोधी पक्षांचा निषेध करण्यासाठी ठाणे महापालिकेची सर्वसाधारण सभा पूर्ण दिवसासाठी तहकूब करण्यात यावी, असा प्रस्ताव भाजपचे नगरसेवक भरत चव्हाण यांनी मांडला होता. त्यास नगरसेविका नंदा पाटील यांनी अनुमोदन दिले होते.

दरम्यान, सभागृहातील विषय पटलावर कोणते प्रस्ताव घ्यायचे, याचा निर्णय घेण्याचे अधिकार महापौरांना असतात. असे असतानाही भाजप नगरसेवकांनी प्रशासनावर टीका करत निषेध नोंदविल्याने हा वाद अधिक चिघळला.

आशा भोसले यांना आदरांजली
ठाणे महापालिकेच्या सभेचे कामकाज सुरू होण्याआधी आयुक्त सौरभ राव यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला आणि त्यानंतर माजी नगरसेवक श्याम पाटील, गायिका आशा भोसले यांच्या निधनाचे दुखवटा ठरावाचे वाचन करून सभा पूर्ण वेळ तहकूब करण्यात आली.

नगरसेवकांमध्ये शाब्दिक वाद
भाजपने दिलेल्या प्रस्ताव पटलावर घेऊन महापौरांनी त्याचे वाचन केले नाही. यामुळे भाजपचे नगरसेवक संतप्त झाले आणि त्यांनी पालिकेच्या आवारात प्रशासनाचा निषेध नोंदविला. यावरून भाजपचे नगरसेवक भरत चव्हाण आणि शिवसेनेचे नगरसेवक राजेश मोरे यांच्यात शाब्दिक वाद झाल्याचे दिसून आले.

नारीशक्ती वंदन विधेयकाबाबतचा निषेध प्रस्ताव सभागृहात वाचला गेला नाही. महिलांवर अन्याय झालेल्या विषयाकडे दुर्लक्ष केल्यामुळे आम्ही प्रशासनाविरोधात निषेध नोंदविला.
- भरत चव्हाण, नगरसेवक, भाजप

सभागृहाचे नियम समजून घेणे आवश्यक आहे. प्रत्येक मुद्द्यावरून वाद निर्माण करण्यापेक्षा सभागृह प्रभावीपणे कसे चालवता येईल यावर लक्ष द्यावे. प्रत्येक वेळी राजकारण करणे योग्य नाही.
- राजेश मोरे, नगरसेवक, शिवसेना (शिंदे गट)

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.