मुंबई इंडियन्सचा प्रमुख आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याला आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमात (IPL 2026) 5 सामन्यांमध्ये एकही विकेट मिळाली नाही. बुमराहसारख्या मॅचविनर आणि स्टार गोलंदाजाला एकही विकेट न मिळाल्याने आश्चर्य व्यक्त केल जात होतं. बुमराहचं अपयशी होणं कुठेतरी त्याच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारं होतं. मात्र बुमराहबाबतही ‘फॉर्म इज टेम्पररी, क्लास इज पर्मनंट’ हे वाक्य खरं ठरलंय. बुमराहने मुंबईच्या आणि आपल्या 19 व्या मोसमातील सहाव्या सामन्यात विकेटचं खातं उघडलंय. बुमराहने विकेट घेताच मैदानात एकच जल्लोष पाहायला मिळाला.
तिलक वर्मा याने केलेल्या नाबाद शतकी खेळीच्या जोरावर मुंबईने गुजरातसमोर अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये 200 धावांचं आव्हान ठेवलं. गुजरातकडून साई सुदर्शन आणि कॅप्टन शुबमन गिल ही सलामी जोडी मैदानात आली. तर जसप्रीत बुमराह पहिली ओव्हर टाकण्यासाठी आला. दोन्ही संघांचे खेळाडू आणि चाहते दुसऱ्या डावासाठी सज्ज झाले. विकेटलेस बुमराहकडे सर्वांचं लक्ष होतं. बुमराहने पहिला बॉल टाकला आणि त्याने त्याच्या नावापुढे असलेला विकेटलेस हा टॅग हटवला.
बुमराहने साई सुदर्शन याला कृष भगत याच्या हाती कॅच आऊट केलं. बुमराहने अशाप्रकारे 19 व्या मोसमात साईला आऊट करत पहिली विकेट मिळवली आणि मुंबईला जबरदस्त सुरुवात मिळवून दिली. बुमराहने विकेट घेताच मैदानात एकच जल्लोष पाहायला मिळाला. बुमराहची पत्नी आणि प्रेझेंटेटर संजना गणेशन स्टेडियममध्ये उपस्थित होती. संजनाने उभ राहत बुमराहने मिळवलेल्या विकेटसाठी आनंद साजरा केला. बुमराह याने घेतलेल्या या विकेटचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
बुमराहची विकेटची प्रतिक्षा संपली, पाहा व्हीडिओ
त्याआधी टॉस गमावून बॅटिंगसाठी आलेल्या मुंबईच्या सलामी जोडीने गुजरातच्या गोलंदाजांसमोर गुडघे टेकले. क्विंटन डी कॉक 13 आणि दानिशन मालेवार याने 2 धावा केल्या. मात्र त्यानंतर नमन धीर, कॅप्टन हार्दिक पंड्या, सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा या चौघांनी योगदान दिलं. हार्दिक आणि सूर्या या दोघांनी प्रत्येकी 15 धावा केल्या. नमन धीर याने 45 धावांचं योगदान दिलं. तर तिलक वर्मा याने डावातील शेवटच्या चेंडूवर चौकार ठोकत आयपीएल कारकीर्दीतील पहिलंवहिलं शतक पूर्ण केलं.
लाईव्ह स्कोअरकार्ड
तिलकने 45 बॉलमध्ये नॉट आऊट 101 रन्स केल्या. तर शेरफेन रुदरफोर्ड 1 धाव करुन नाबाद परतला. तर गुजरातसाठी कगिसो रबाडा याने सर्वाधिक 3 विकेट्स मिळवल्या.