आयपीएल 2026 स्पर्धेत मुंबई इंडियन्सने पहिल्या सामन्यात विजय मिळवला आणि सकारात्मक सुरूवात केली. पण त्यानंतर मुंबई इंडियन्सची विजयाची गाडी रूळावरून पार घसरली. मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंचा फॉर्म चिंतेचा विषय ठरला. संघात दिग्गज खेळाडूंना भरणा असूनही वारंवार पराभवाला सामोरं जावं लागत असल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात होतं. हार्दिक पांड्याच्या कर्णधारपदावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं गेलं. त्यामुळे नुसता पराभव नाही तर रणनीतीही काही तरी चुकतंय असं मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांचा म्हणणं होतं. मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात जसप्रीत बुमराहसारखा वर्ल्ड क्लास गोलंदाज असताना असं कसं होत आहे याची चाचपणी केली जात होती. कारण जसप्रीत बुमराह विकेटलेस जाणं ही मोठी गोष्ट होती. या पर्वातील पाच सामने एकही विकेट न मिळणं म्हणजे काहीतरी चुकतंय हे नक्की होतं. कर्णधार हार्दिक पांड्याने ही चूक सहाव्या सामन्यात सुधारली आणि पहिल्याच चेंडूवर विकेट मिळाली.
कर्णधार हार्दिक पांड्याने पहिलं षटक जसप्रीत बुमराहकडे सोपवलं. या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर साई सुदर्शनची विकेट मिळाली. त्याने त्याला गोल्डन डकवर तंबूत पाठवलं. पण हार्दिक पांड्याचं काय चूकत होतं. तर हार्दिक पांड्या त्याला पहिलं षटक देत नव्हता. सहाव्या सामन्यात हार्दिकने पहिलं षटक दिलं आणि त्याने विकेटलेस ग्रहण सोडवलं. इतकंच काय तर पहिल्या षटकात फक्त 1 धावा दिली. त्यानंतर दुसऱ्या षटकात 10 धावा दिल्या. पण जसप्रीत बुमराहचा प्रभाव सामन्यात दिसला.
आयपीएल स्पर्धेतील पहिला सामन्यात मुंबई इंडियन्सने कोलकात्यावर विजय मिळवला. पण या सामन्यात पहिलं षटक ट्रेंट बोल्टने टाकलं होतं. दुसऱ्या सामन्यापासून पराभवाची मालिका सुरू झाली. दुसरा सामना दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध झाला आणि या सामन्यात दीपक चाहरने पहिलं षटक टाकलं. तिसरा सामना राजस्थान रॉयल्सविरुद्ध झाला आणि या सामन्यातही दीपक चाहरने गोलंदाजी केली. चौथ्या सामन्यात आरसीबी समोर होती आणि पहिलं षटक ट्रेंट बोल्टने टाकलं. त्यानंतर पाचव्या सामन्यात पंजाब किंग्स समोर असताना दीपक चाहरकडे चेंडू सोपवला होता. पण सहाव्या सामन्यात अस्त्र लपवण्यापेक्षा पहिल्याच षटकात काढलं आणि जसप्रीत बुमराहला सूर गवसला.