मी संघर्षयोद्ध्याची सहचारिणी, येसूबाई जशा लढल्या तशी लढेन; बारामतीच्या मैदानातून सुनेत्रा पवारांचा विश्वास
एबीपी माझा ब्युरो April 21, 2026 08:13 PM

पुणे : दादा जरी गेले असले तरी त्यांची स्वप्ने अजूनही जिवंत आहेत, तीच स्वप्न पूर्ण करण्याचं काम मी करेन, बारामतीकरांच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही असं वक्तव्य सुनेत्रा पवार यांनी केलं. मी संघर्षयोद्ध्याची सहचारिणी आहे. येसूबाई जशा लढल्या तशी लढेन, अहिल्यादेवींनी जसा कारभार केला तसा कारभार करेन. सर्वांना न्याय देण्याचं काम करेन असा विश्वास सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केला. 

बारामती पोटनिवडणुकीची सांगता सभा मंगळवारी पार पडली. यावेळी अजित पवारांच्या आठवणीत सुनेत्रा पवार भावूक झाल्याचं दिसून आलं. या सांगता सभेला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे प्रमुख नेते आणि खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. बारातमीसाठी 23 एप्रिल रोजी मतदान पार पडणार आहे. 

येसूबाईंप्रमाणे लढणार

आपल्या सांगता सभेच्या भाषणावेळी सुनेत्रा पवार या भावुक झाल्याचं दिसून आलं. आपल्या भाषणात सुनेत्रा पवार म्हणाल्या की, "दादा जरी गेले तरी त्यांची स्वप्न अजूनही जिवंत आहेत. दादांची जागा कुणीच घेऊ शकत नाही. मात्र त्यांच्या विचाराचा वारसा मी पुढे घेऊन जाणार आहे. बारामतीकर जनता माझ्या पाठीशी आहे, तोपर्यंत मी खचणार नाही. मागे हटणार नाही. मी एका संघर्षयोद्ध्याची सहचारिणी आहे. येसुबाई जशा लढल्या, तसेच मी लढेन. अहिल्यादेवींनी जसा कारभार केला, तसाच कारभार करेन."

ही माती माझी आहे, त्यामुळे दादांप्रमाणे तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा, त्याला कधीच तडा जाऊ देणार नाही. आपण लाखोंचा पोशिंदा गमावला. दादांचं स्वप्न आणि त्यांच्या कर्तव्याची जाणीव, त्यांच्या पश्चात माझ्यावर आलेल्या जबाबदारीची जाणीव आहे. त्याचा शिवधनुष्य मी उचलून तुमच्यासमोर आले आहे. दादांच्या विचारांचा वारसा पुढे घेऊन जाईन, असं सुनेत्रा पवार म्हणाल्या.

सुनेत्रा पवार म्हणाल्या की, "दादांच्या अपघाताबाबत जशा तुमच्या मनात शंका आहेत तशाच माझ्यादेखील मनात आहेत. त्यामुळेच मी नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांची भेट घेऊन विनंती केली आहे. काही चुकीचं आढळल्यास कठोरात कठोर शिक्षा ही व्हायलच हवी. त्यासाठी मी प्रयत्न करेन."

शरद पवारांचे आभार

सर्व पक्षांनी आपल्याला दिलेल्या पाठिंब्याबद्दल आभार मानते, शरद पवार आमि सुप्रिया सुळे यांचे विशेष आभार मानते असं सुनेत्रा पवार म्हणाल्या. दादांनी बारामतीला ज्या उंचीवर नेलं, जो मान देशात मिळवून दिला तोच आपल्याला टिकवायचा आहे, असंही त्या म्हणाल्या.

महायुतीच्या मंचावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही हजेरी लावली. या सभेत बोलताना सुप्रिया सुळे यांनी महाविकास आघाडी सुनेत्रा पवारांच्या पाठीशी ठामपणे उभी असल्याचं स्पष्ट केलं.  तसेच कार्यकर्त्यांना एकजुटीने काम करण्याचे आवाहनही त्यांनी केलं.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.