करिअर वेध : फ्रंटफूट आणि बॅकफूट
esakal April 22, 2026 08:45 AM

विनायक द्रविड, करिअर मार्गदर्शक व ट्रेनर

या भूतलावर प्रत्येक माणूस वेगळा आहे, असे म्हटले जाते आणि ते शंभर टक्के खरे आहे. देवाने प्रत्येक माणसाला वेगळे बनविले आहे. प्रत्येकाचा स्वभाव वेगळा, देहबोली वेगळी, स्वभाव वेगळा, आहार वेगळा, संस्कार वेगळे, शरीरयष्टी वेगळी. कोणी खूप शांत, कोणी खूप तापट स्वभावाचा कोणी थंड कोणी भडक इत्यादी. या विविध गुणदोषांमुळे प्रत्येक माणूस समोरच्याशी कसे वर्तन करतो ते ठरते. अनेकदा असे पाहायला मिळते की, काही लोक कायम आग्रही, चिडलेले आणि वरच्या पट्टीत बोलतात त्यांना आपण कायम फ्रंटफूटवर आलेली लोकं असे म्हणायला हरकत नाही. याउलट काहींचा स्वभाव खूप शांत, मवाळ आणि कोणाच्या अध्यात ना मध्यात असा असतो. त्यांना बॅकफूटवरची माणसं म्हणायला हरकत नाही. खरे तर फ्रंटफूट आणि बॅकफूट हे दोन्ही क्रिकेटमधले स्ट्रोक्स आहेत. परंतु याचा अर्थ आपल्या रोजच्या जीवनाशीही तितकाच निगडित आहे. कसे ते पाहूयात.

क्रिकेटच्या भाषेत फ्रंटफूट म्हणजे फलंदाजाने पुढे पाय टाकून मारले फटके. उदा ः कव्हर ड्राईव्ह, ऑन ड्राईव्ह, ऑफ ड्राईव्ह इत्यादी. बॅकफूटवरचे फटके म्हणजे पाय मागे टाकून मारलेले फटके. उदा ः स्क्वेअर कट, हुक, पूल, बॅकफूट ड्राईव्ह. आपल्या रोजच्या आयुष्याचा सामाजिक वर्तणुकीचा, कॉर्पोरेट वर्तणुकीचा या दोन्ही संज्ञांचा फार जवळचा संबंध आहे. आपण क्रिकेटमध्ये फ्रंटफूटला येतो तसेच आपण घरी, सामाजिक जीवनात, नोकरीत कधीकधी आग्रही होतो, परंतु तसे वागणे प्रत्येक वेळी यश देईलच असे नाही. खरंतर या वागण्याने यशाचे प्रमाण कमी होते. माणसाने कोणत्या परिस्थितीत व कधी फ्रंटफूटवर यावे हे आयुष्यात महत्त्वाचे आहे. तुम्ही योग्य वेळी बॅकफुटवर गेलात तर तुम्हाला जास्त यश मिळण्याची शक्यता आहे. आपल्याला संपूर्ण आयुष्यात फ्रंटफूट आणि बॅकफूट याचा योग्य समन्वय साधता आला पाहिजे.

क्रिकेटमध्ये पाहायला गेल्यास बॅकफूटवरचे शॉट हे कदाचित तुम्हाला जास्त धावा मिळवून देतात. त्यामुळे बॅकफुटला जाणे म्हणजे माघार घेणे असे अजिबात नाही आणि हीच गोष्ट आपल्या आचरणात लागू होते. तुम्ही सारखे आग्रही राहून चालत नाही. त्याचा तोटाच होतो. सर्व गोष्टींचा योग्य समतोल साधता येतो तो नक्कीच यशस्वी होतो.

फ्रंटफूट आणि बॅकफूट याचा घरात, संसारात, समाजात, नोकरीत, कॉर्पोरेट जगतात, राजकारणात आणि खेळात योग्य वापर केल्यास आपल्याला यश नक्कीच मिळू शकते.

कॉर्पोरेट जगतात अनेकदा रिव्ह्यू मीटिंग असतात, तेव्हा वरिष्ठ मंडळींसमोर तुम्हाला काही सादरीकरण करावे लागते. अनेक मुद्द्यांवर चर्चा होते अशावेळी तुमची देहबोली, तुमची बोलण्याची पद्धत ही कशी आहे यावर खूप गोष्टी अवलंबून असतात. तुम्ही अधिक आग्रहीपणाने बोलणे योग्य ठरत नाही. तुम्हाला योग्य वेळी थोडे बॅकफुटला जाऊन लोकांची मते जाणून घेणे हे महत्त्वाचे असते. विशेषतः क्रिकेटमध्ये याला खूपच महत्त्व आहे. राहुल द्रविडला एका मुलाखतीत विचारले होते की, शोएब अख्तर वेगवान चेंडू टाकत असताना तुमची बॅटिंगची स्ट्रॅटेजी कशी ठरवतात? त्यावर त्याने दिलेले उत्तर फार महत्त्वाचे होते आणि त्या विषयाशी निगडित आहे. तो म्हणाला, ‘‘दिवसाचे पहिले अडीच, तीन तास रिस्क न घेता विकेटवर थांबणे व शेवटचे तीन तास फ्री खेळणे.’’ थोडक्यात दिवसाचा पहिला भाग बॅक फूटवर जाणे आणि दुसरा भाग फ्रंट फूटवर येणे हे फार महत्त्वाचे तंत्र आहे. माणसाच्या आयुष्यातही हे असेच लागू पडते याचा योग्य समतोल साधने सोपे नाही.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.