एन. शिवराज मैदानात स्वच्छता मोहिम
esakal April 22, 2026 08:46 PM

एन. शिवराज मैदानात स्वच्छता मोहीम
ज्येष्ठ, महिलांसह युवकांचा उत्स्फूर्त सहभाग
धारावी, ता. २२ (बातमीदार) : गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्षित राहिलेल्या धारावीतील एन. शिवराज मैदानात स्वच्छता आणि देखभाल सुधारावी, या मागणीसाठी धारावी नागरिक समिती आणि झोपडपट्टी पोलिस पंचायत (बीट क्रमांक २) यांच्या पुढाकारातून विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. पालिकेच्या जी-उत्तर विभाग, उद्यान विभाग आणि घनकचरा विभाग यांच्या सहकार्याने मंगळवारी (ता. २२) ५५व्या जागतिक वृक्ष संवर्धन दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
या मोहिमेत मैदानाची साफसफाई, झाडांभोवती झाडलोट, दगड-मातीची व्यवस्था, वृक्षांना पाणी व खत देणे अशी कामे करण्यात आली. तसेच मयूर कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हास्ययोग व नियमित व्यायामाचे सत्र घेण्यात आले. या उपक्रमात परिसरातील ज्येष्ठ नागरिक, महिला आणि युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
कार्यक्रमासाठी घनकचरा विभागाचे चंद्रकांत तांबे आणि कनिष्ठ वृक्ष अधिकारी स्वाती शेवडे यांनी मार्गदर्शन केले. तसेच धारावी नागरिक समितीचे प्रमुख मार्गदर्शक दिलीप गाडेकर, अलका साबळे, संदीप ढवळे, कनिष्ठ पर्यवेक्षक निरंजना जगताप, मुकादम अशोक येवले आणि इतर कामगारवर्ग उपस्थित होता. किरण खंदारे, अशोक काळे, मीना गौतम, संजय सोनवणे आदींचेही सहकार्य लाभले.
मैदानात नियमावलीचे फलक लावावेत, कार्यक्रमांनंतर परिसरात पसरलेले साहित्य तातडीने हटवावे तसेच दुसऱ्या दिवशी युद्धपातळीवर स्वच्छता करावी, अशी मागणी धारावी नागरिक समितीने प्रशासनाकडे केली आहे. मैदान वापरणाऱ्या नागरिकांनीही स्वच्छतेची जबाबदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.