Pune Traffic Diversion: पुणे मध्यवर्ती भागात २३ एप्रिलला मिरवणुकीदरम्यान पीएमपी बस व वाहनांचे मार्ग बदलणार; वाहतूक पोलिसांकडून सूचना जाहीर
esakal April 23, 2026 03:45 AM

पुणे : काळभैरवनाथ मंदिर ते छोटा शेख सल्लाह दर्गा या मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील मध्यवर्ती भागात गुरुवारी (ता. २३) वाहतुकीत तात्पुरते बदल करण्यात येणार आहेत.नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन प्रभारी वाहतूक पोलिस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी केले आहे.

दुपारी चार ते रात्री १० या कालावधीत पीएमपी बसेस, चारचाकी तसेच जड-अवजड वाहनांच्या मार्गात बदल करण्यात येणार आहेत. मिरवणुकीचा मार्ग त्रिमूर्ती चौक, योजना बेकरी चौक, देवजीबाबा चौक, आरसीएम गुजराथी हायस्कूल, फडके हौद चौक, साततोटी चौकी, भोई आळी चौक मार्गे छोटा शेख सल्लाह दर्गा येथे समाप्त होणार आहे.

वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुंभारवेस चौकातून पवळे चौक मार्गे फडके हौदकडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात येईल. वाहनचालकांनी कुंभारवेस चौकातून डावीकडे वळून शाहिर अमर चौक व गाडगीळ पुतळा मार्गे पर्यायी मार्गाचा वापर करावा.

छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरून जिजामाता चौकातून गणेश रस्त्याने दारुवाला पुलाकडे जाणारी पीएमपी बस व चारचाकी वाहतूक गाडगीळ पुतळा येथून वळवण्यात येईल. तसेच गणेश रस्त्यावरून देवजीबाबा व जिजामाता चौकाकडे जाणारी वाहतूक अपोलो टॉकीज, नरपतगिरी चौक, दारुवाला पुल, दुधभट्टी मार्गे वळवण्यात येणार आहे.

लक्ष्मी रस्त्यावरून सोन्या मारुती चौकातून फडके हौद चौकमार्गे पवळे चौकाकडे जाणारी वाहतूक फडके हौद चौकातून डावीकडे वळवून जिजामाता चौकातून पुढे सोडण्यात येईल.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.