Baramati Election : 'तुम्हाला तुमचं स्वत:च कळत नाही, तर भाजपला..' त्या प्रश्नावर अजित पवार यांच्या सख्ख्या भावाचं परखड मत
Tv9 Marathi April 23, 2026 04:45 PM

आज बारामती विधानसभेची पोटनिवडणूक होत आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांच्या विजयासाठी पवार कुटुंब ताकदीने मैदानात उतरलं आहे. जिंकण्यापेक्षा किती मताधिक्क्याने विजय होणार ते महत्वाचं आहे. अजितदादा यांच्या अकाली जाण्याने बारामती मतदारसंघात एक सहानुभूतीची लाट आहे. 28 जानेवारीला विमान अपघातात अजित पवार यांचं बारामती येथे निधन झालं. सुनेत्रा पवार राष्ट्रवादी, महायुतीच्या उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्रीनिवास पवार टीव्ही 9 मराठीशी बोलले. ते अजित पवार यांचे सख्खे बंधु आहेत.

2029 मध्ये बारामती विधानसभेचं चित्र काय असेल? पवार विरुद्ध पवार सामना होईल का? यावर ‘काळ सांगेल काय होतयं ते’ असं उत्तर त्यांनी दिलं. युगेंद्र पवार यांचं म्हणणं आहे की, कार्यकर्त्यांची अशी इच्छा आहे की, या भागातून मी 2029 मध्ये उमेदवारी करावी यावर श्रीनिवास पवार यांनी ‘ज्यांचे कार्यकर्ते असतात, त्यांना वाटतं आपल्या नेत्याने पुढचं पाऊल टाकलं पाहिजे’ असं श्रीनिवास पवार यांनी उत्तर दिलं.

हे आत्ता सांगणं अवघड आहे

2029 ला पवार विरुद्ध पवार सामना होऊ शकतो का? जे लोकसभेला, विधानसभेला दिसलं. “पुन्हा फिरवून, फिरवून तुम्ही तोच प्रश्न विचारताय. 2029 ला नक्की काय चित्र असेल, हे आत्ता सांगणं अवघड आहे. दादांचं असं अचानक जाणं होईल हे आपल्याला 27 जानेवारीपर्यंत कुठे माहित होतं. तीन वर्षात काय होईल? सगळे पक्ष वेगळे लढतील का? युती होईल का? दोघे एकत्र होतील का? असे सगळे क्वेशनमार्कवाले प्रश्न आहेत. वहिनींना आता दोन-तीन महिने झालेत. सेटल व्हायला वेळ लागेल. सेटल झाल्यावर त्यांची मत बदलतील की ठाम होतील? दोन्ही होऊ शकतं” असं श्रीनिवास पवार म्हणाले.

भाजपला बदनाम करण्यात काय उपयोग?

भाजप अशा पद्धतीने पवार कुटुंबात राजकारण लावून देतय का? यावर श्रीनिवास पवार यांनी “भाजपला बदनाम करण्यात काय उपयोग? तुम्हाला तुमचं स्वत:च कळत नाही. पवार कुटुंब राजकारणातलं एवढं जुनं कुटुंब आहे. तुम्हाला ते समजलं पाहिजे” असं श्रीनिवास पवार म्हणाले.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.