आयपीएल स्पर्धेदरम्यान मोठी घोषणा, यशस्वी जयस्वाल-अजिंक्य रहाणे आता नव्या संघातून खेळणार
GH News April 23, 2026 11:12 PM

आयपीएल 2026 स्पर्धेत यशस्वी जयस्वाल आणि अजिंक्य रहाणे यांच्या नावाची चर्चा आहे. यशस्वी जयस्वाल आक्रमक फलंदाजीमुळे चर्चेत आहे. तर अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात कोलकाता नाईट रायडर्स संघाची वाताहत झाली आहे. असं असताना टी20 मुंबई लीग स्पर्धेची तयारीला जोर आला आहे. टी20 मुंबई स्पर्धेचं यंदा चौथं पर्व आहे. या स्पर्धेत एकूण आठ संघ सहभागी होतात. आकाश टायगर्स, आर्क्स अंधेरी, ब्रांद्रा ब्लास्टर्स, ईगल ठाणे स्ट्रायकर्स, मराठा रॉयल्स, नॉर्थ मुंबई पँथरस, सोबो मुंबई फाल्कन्स आणि ट्राइंफ नाईटस् मुंबई नॉर्थ ईस्ट असे संघ आहेत. मागच्या पर्वात साउथ सेंट्रल मराठा रॉयल्सने जेतेपद मिळवलं होतं. अशी सर्व पार्श्वभूमी असताना बांद्रा ब्लास्टर्स संघाने कंबर कसली आहे. बांद्रा ब्लास्टर्स संघाने यशस्वी जयस्वालला आपल्या संघात घेण्यात यश मिळवलं आहे. दुसरीकडे, कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार अजिंक्य रहाणे देखील या स्पर्धेत नॉर्थ मुंबई पँथर्सकडून खेळताना दिसणार आहे.

यशस्वी जयस्वाल खेळणार की नाही?

टी20 मुंबई स्पर्धेसाठी बांद्रा ब्लास्टर्सने यशस्वी जयस्वाल संघात घेण्यात यश मिळवलं आहे. पण टी20 मुंबई स्पर्धेत त्याचं खेळणं जरा कठीणच वाटत आहे. कारण या दरम्यान यशस्वी जयस्वालला टीम इंडियासाठी कसोटी सामना खेळावा लागणार आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात यशस्वी जयस्वाल ओपनिंग करताना दिसेल. असं असताना त्याचं मुंबई टी20 स्पर्धेत खेळणं जरा कठीणच वाटत आहे. यशस्वी जयस्वालने आयपीएल 2026 स्पर्धेत प्रभावी कामगिरी केली आहे. त्याने 7 सामन्यांमध्ये 49 च्या सरासरीने 245 धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राइक रेट 150पेक्षा जास्त आहे. त्याने आतापर्यंत दोन अर्धशतके झळकावली आहेत. त्याने 12 षटकार आणि 27 चौकार मारले आहेत.

अजिंक्य रहाणेची आयपीएल कामगिरी

अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात कोलकाता नाईट रायडर्स संघाची स्थिती काही चांगली नाही. सुरूवातीचे सामने गमवल्याने संघ करो या मरोच्या स्थितीत आला आहे. त्यात कर्णधार अजिंक्य रहाणेची बॅट हवी तशी चाललेली नाही. अजिंक्य राहणेने या स्पर्धेत चांगली सुरूवात केली. मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात 67 धावांची खेळी केली. त्यानंतर लखनौ विरुद्ध 41 धावा केल्या. पण त्यानंतर त्याची गाडी रूळावरून घसरली. चेन्नईविरुद्ध 8, पंजाब विरुद्ध 8, गुजरात आणि राजस्थानविरुद्ध खातंही खोलता आलं नाही. अजिंक्य राहणेने 7 सामन्यात 152 धावा केल्या आहेत.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.