उधार दिलेले पैसे देता येत नसतील तर, मुलीला माझ्याकडे पाठव… मुलीवर वाईट नजर टाकली, नराधम सावकराची हत्या
Tv9 Marathi April 24, 2026 10:46 PM

नागपूरमध्ये अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. पोटच्या गोळ्यावर वाईट नजर टाकणाऱ्या सावकाराची बापानेच हत्या केल्याने खळबळ उडाली आहे. ‘उधार दिलेले पैसे परत देता येत नसेल, तर मुलीला माझ्याकडे पाठव’ असं म्हणत मुलीवर वाईट नजर टाकणाऱ्या सावकाराची मुलीच्या वडिलाने हत्या केलीय. नागपूरातील जरीपटका पोलीस स्टेशन हद्दीत ही धक्कादायक घटना घडली. मृतक राहूल साहू याची हत्या करणारा बाप नवीन पंजाबराव पुंडकर याला पोलीसांनी अटक केली आहे. या घटनेमुळे नागपूरमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

नागपूर नारा घाट परिसरातील पिवळी नदीच्या पुलाखाली 22 तारखेला एका पोत्यात राहूल साहू यांचा मृतदेह आढळून आला होता. पोत्यावरुन चौकशीची सूत्रं हल्ली आणि पोलिसांनी मृतदेहाचे गूढ उकलले. सावकार राहूल साहू याने मुलीवर वाईट नजर टाकली म्हणून नवीन पुंडकर याने त्याची हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली. याप्रकरणी पोलिसांनी 40 वर्षीय ई-रिक्षा चालक नवीन पंजाबराव पुंडकर याला अटक केली असून त्याने रागाच्या भरात ही हत्या केल्याची कबुली दिली, असल्याची माहिती जरीपटका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल ताकसांडे यांनी दिली आहे.

घरी येऊन थेट..

आरोपी नवीनने करोना संकटाच्या काळात राहुल साहू याच्याकडून काही रक्कम व्याजाने घेतली होती. नवीनच्या दाव्यानुसार, त्याने मुद्दल आणि व्याजासह दुप्पट रक्कम राहुलला परत केली होती. पण राहुलची पैशांची हाव संपली नव्हती. तो नवीनकडे आणखी 35 हजार रुपयांसाठी सतत तगादा लावत होता. घटनेच्या दिवशी राहुल पैसे वसुलीसाठी थेट नवीनच्या घरी पोहोचला. यावेळी दोघांमध्ये पैशांच्या देवाणघेवाणीवरून तीव्र शाब्दिक चकमक झाली. वादाचे रूपांतर संतापात झाले तेव्हा राहुलने, “जर पैसे देऊ शकत नसशील, तर तुझ्या मुलीला शरीरसुखासाठी माझ्याकडे पाठव,” अशी अत्यंत अश्लील आणि संतापजनक मागणी केली. त्यामुळे संतापलेल्या नवीनने राहुलचा काटा काढला, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.