Kolhapur infrastructure development : ‘आयटी पार्कमुळे जिल्ह्याची प्रगतीच्या दिशेने वेगाने वाटचाल होणार आहे. त्यामुळे पुढील वाटचालीचा रोडमॅप आम्हाला द्या. कालबद्ध नियोजन करा. त्याच्या माध्यमातून आयटी पार्क लवकर सुरू करूया’, असे आवाहन पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी आज येथे केले. दरम्यान, या पार्कला छत्रपती ताराराणी यांचे नाव देण्यासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिली.
शेंडा पार्क येथे आयटी पार्क करण्यास राज्य शासनाची मंजुरी मिळविण्यासाठी पाठपुरावा करणाऱ्या लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आयटी असोसिएशन ऑफ कोल्हापूरने रेसिडेन्सी क्लबमध्ये घेतलेल्या सत्काराच्या कार्यक्रमात ते बोलत होते. पालकमंत्री आबिटकर, आमदार क्षीरसागर, महापौर रूपाराणी निकम, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी उमेश देशमुख, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक यांचा असोसिएशनतर्फे सत्कार करण्यात आला.
IT Park Kolhapur : कोल्हापुरातील आयटी पार्कसाठी जमीन हस्तांतरणाचा आदेश, महानगरपालिकेची परवानगी घ्यावीच लागणार‘मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींच्या प्रयत्नातून आयटी पार्कला शासनाची मंजुरी मिळाली. महायुतीच्या सरकारने कोल्हापूरच्या विकासाला गती दिली आहे. त्यातील आयटी पार्क हे महत्त्वाचे पाऊल आहे. आपण इतके चांगले, पोषक वातावरण तयार करूया की, पुण्यातील आयटी कंपन्या कोल्हापुरात येतील’, असे आवाहन पालकमंत्री आबिटकर यांनी केले.
आमदार क्षीरसागर म्हणाले, ‘शाश्वत विकास परिषदेपासून या आयटी पार्कचा मुद्दा अधिक ताकदीने शासनासमोर मांडला आणि पार्कला मंजुरी मिळाली. पार्कमुळे जिल्ह्यातील ब्रेनड्रेन थांबणार आहे. या पार्कमध्ये उच्च दर्जाच्या पायाभूत सुविधा आणि स्थानिक आयटी उद्योजकांना जागा प्राधान्याने उपलब्ध करून देण्यास प्रयत्नशील आहे.’ स्थानिक उद्योजकांना या पार्कमध्ये जागा, सुविधा देण्यास पाठपुरावा करणार असल्याचे महापौर निकम यांनी सांगितले.’
यावेळी ‘आयटी असोसिएशन’चे संस्थापक अध्यक्ष शांताराम सुर्वे, अध्यक्ष प्रताप पाटील, उपाध्यक्ष धवल चौगले, सचिव राहुल मेंच, खजानिस रणजित नार्वेकर,संचालक आदिनाथ पाटील, विश्वजीत देसाई, मंदार पेटकर, मनीष राजगोळकर, ‘कोल्हापूर फर्स्ट’चे अध्यक्ष सुरेंद्र जैन, प्रसन्न कुलकर्णी आदी उपस्थित होते. पंडित कंदले यांनी सूत्रसंचालन केले.
‘कोल्हापूरला मोठी आयटी इंडस्ट्री बनवून दाखवू’
कोल्हापुरात अल्ट्रा ॲडव्हॉन्स आयटी पार्क कसा करता येईल, याचे सादरीकरण प्रताप पाटील आणि राहुल मेंच यांनी यावेळी केले. ‘आम्हा सर्वांना भक्कम पायाभूत सुविधा द्या. कोल्हापूरला राज्यातील सर्वात मोठी आयटी इकॉनॉमी इंडस्ट्रीज बनवून दाखवू. महाराष्ट्रातील अन्य ३५ जिल्ह्यांसाठी कोल्हापूरला रोल मॉडेल बनवू,’ असे त्यांनी सांगितले.
उद्घाटनावेळीच सत्कार स्वीकारणार
शासनाने दिलेल्या जागेत आयटी पार्क साकारल्यानंतर त्याच्या उद्घाटनावेळीच आम्ही सर्वजण सत्कार स्वीकारणार आहे. त्याबाबतचा निर्णय आयटी असोसिएशनच्या आजी-माजी सर्व पदाधिकाऱ्यांनी आज जाहीर केला.