ऑफिसमधील कामाचा ताण, घराची जबाबदारी.. अशा अनेक गोष्टींमुळे आपण आपल्या आरोग्याकडे लक्ष देतच नाही. परणामी एक दिवस असा येतो, ज्यामुळे एका गंभीर आजाराच्या विळख्यात आपण सापडतो आणि त्याचे लक्षणं देखील आपल्याचा जाणवत नाही… सहसा, शरीराच्या कोणत्याही भागात वेदना, थोडा थकवा किंवा जळजळ जाणवल्यास, आपल्याला वाटतं की आपले आरोग्य ठीक नाही. परंतु काही आजार कोणत्याही स्पष्ट लक्षणांशिवाय शरीरात हळूहळू वाढतात. यांना ‘शांत आजार’ म्हणजे Silent Diseases असं देखील म्हणतात. असे आजार आरोग्याला गंभीर हानी पोहोचवू शकतात. शिवाय, ते उशिरा लक्षात येण्याचा धोकाही असतो. तर मग हे आजार कोणते आहेत? त्यांची लक्षणे का दिसत नाहीत? त्यांना टाळण्यासाठी कोणती खबरदारी घ्यावी? याबद्दल सविस्तर जाणून घेऊ.
तज्ज्ञांनी सांगतिल्यानुसार, मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयाच्या समस्या, थायरॉईडचे असंतुलन आणि काही प्रकारचे कर्करोग सुरुवातीच्या टप्प्यात लक्षणं दाखवत नाहीत. ते हळूहळू शरीराच्या अवयवांना नुकसान पोहोचवतात. बरेच लोक सहसा थकवा आणि सुस्तीकडे दुर्लक्ष करतात. पुढे, यामुळे गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात.
काही आजार हळूहळू वाढतात. त्यामुळे त्यांची लक्षणं लगेच दिसून येत नाहीत. शरीर काही काळ अंतर्गत बदलांमध्ये संतुलन राखण्याचा प्रयत्न करते. परिणामी, व्यक्तीला कोणतीही अस्वस्थता जाणवत नाही. तसेच, सुरुवातीची लक्षणं इतकी सौम्य असतात की त्यांना सामान्य समजून त्याकडे दुर्लक्ष केलं जातं.
अशा आजारांना प्रतिबंध करण्यासाठी नियमित आरोग्य तपासणी करून घेणं खूप महत्त्वाचं आहे. वर्षातून एकदा किंवा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आरोग्य तपासणी करून घेणं उत्तम ठरेल. संतुलित आहार, नियमित व्यायाम, पुरेशी झोप आणि तणावाचं व्यवस्थापन आरोग्य टिकवून ठेवण्यास मदत करतात. त्यामुळे, शरीरातील किरकोळ बदलांकडेही दुर्लक्ष करू नये.
कोणतीही लक्षणे दिसल्यास, ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. आजाराचे वेळेवर निदान झाल्यास उपचार करणे सोपे जाते. यामुळे, भविष्यात उद्भवू शकणाऱ्या गंभीर समस्या टाळता येतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणतेही बदल करण्यापूर्वी सर्वातआधी डॉक्टरांचा सल्ला घ्या.