अजितदादांची उणीव भरुन काढण्याची क्षमता जय पवारांमध्ये, त्यांना विधानपरिषदेवर पाठवावं, अमोल मिटकरींची मागणी 
निलेश बुधावले, एबीपी माझा April 27, 2026 07:13 PM

Amol Mitkari on Vidhanparishad Election News :  महाराष्ट्र विधान परिषदेच्या 9 जागांसाठी निवडणूक जाहीर (Maharashtra Vidhan Parishad Election 2026) करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्रातील विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. विधान परिषदेच्या 9 जागांसाठी 12 मे रोजी मतदान होणार आहे. विधानपरिषद मिळवण्यासाठी प्रत्येक पक्षात इच्छुकांची मोठी गर्दी दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांची देखील मुदत संपत आहे. या निवडणुकीबाबत त्यांनी मोठं  वक्तव्य केलं आहे. विधान परिषदेच्या रिक्त होणाऱ्या जागेवर पक्षाकडून जय पवार यांना पाठवावं अशी मागणी अमोल मिटकरी यांनी केली आहे. अजित पवार यांची उणीव भरून काढण्याची क्षमता जय पवार यांच्यात असल्यामुळं त्यांना विधान परिषदेवर पाठवावं असं मिटकरींनी म्हटलंय. 

नेमकं काय म्हणाले अमोल मिटकरी?

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधानपरिषदेच्या एका जागेसाठी कार्यकर्ते व नेत्यांच्या जवळच्या लोकांची लॉबिंग व चढाओढ पाहता आगामी काळात राज्यभर पक्ष वाढीसाठी अजितदादांसारखा विश्वासू व युवा चेहरा पुढे आणण्याची आवश्यकता आहे. सद्यस्थिती जय पवार हे नाव या जागेसाठी सर्वोत्तम आहे. कदाचित इतरांना घराणेशाही वाटेल ते वाटू देत मात्र दादा नंतर भविष्यात हा चेहरा महाराष्ट्रासाठी दादांसारखाच आश्वासक वाटतो. दादांची उणीव भरून करण्याची क्षमता असलेला हा चेहरा राष्ट्रवादी पक्षासाठी संजीवनी ठरेल. अर्थात अंतिम निर्णय पक्षाचा असं ट्वीट अमोल मिटकरी यांनी केलं आहे.

विधान परिषदेतील 9 आमदारांचा कार्यकाळ संपणार

1. उद्धव ठाकरे (शिवसेना - उबाठा)

2. नीलम गोऱ्हे (शिवसेना)

3. शशिकांत शिंदे (राष्ट्रवादी - शरद पवार गट)

4. अमोल मिटकरी (राष्ट्रवादी - अजित पवार गट)

5. गोपीचंद पडळकर (भाजप)

6. रणजितसिंह मोहिते-पाटील (भाजप)

7. राजेश राठोड (काँग्रेस)

8. प्रवीण दटके (भाजप)

9. रमेश कराड (भाजप)

28 मतांचा कोटा आवश्यक

दरम्यान, विधान परिषदेचा एक आमदार निवडून येण्यासाठी 28 मतांचा कोटा आवश्यक आहे. महायुतीत भाजप (131 आमदार), एकनाथ शिंदे यांची शिवसेना (57 आमदार) आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी (40 आमदार) असे बलाबल पाहता महायुतीचे 8 उमेदवार सहज निवडून येऊ शकतात. तर महाविकास आघाडीचे एकूण संख्याबळ 46 आहे. त्यामुळे त्यांचा केवळ एकच उमेदवार सहज निवडून येऊ शकतो. दुसऱ्या जागेसाठी त्यांना 10 मतांची जुळवाजुळव करावी लागेल, जे सध्याच्या स्थितीत कठीण दिसत आहे.

विधान परिषदेच्या निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम- (Maharashtra Vidhan Parishad Election 2026)

निवडणुकीची अधिसूचना जारी करणे : 23 एप्रिल, 2026 

उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस: 30 एप्रिल 2026

उमेदवारी अर्जांची छाननी: 2 मे 2026 

उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख: 4 मे 2026

मतदानाची तारीख: 12 मे 2026

मतदानाची वेळ: सकाळी 9 वाजेपासून ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत आहे.

मतमोजणी: 12 मे 2026 संध्याकाळी 5 वाजता

निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम तारीख: 13 मे 2026 

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.