अॅड. अभिधा निफाडे
साधारणतः संध्याकाळी सहा-साडेसहाची वेळ, उन्हाचा दाह कमी झालेला, शेतातून माणसं परतलेली आणि बायकांची स्वयंपाकाची गडबड असा काहीसा माहोल मला आठवतो. लहानपणी मी सुट्टीला गावाकडे जायचे तेव्हा मित्रांबरोबर पारावर तासनतास गप्पा मारत बसलेल्या माझ्या आजोबांना जेवायला बोलवायची जबाबदारी हमखास मला मिळत असे. ‘आबा, जेवायला चला’, असे म्हणून मी पारावरच्या त्या रंगलेल्या गप्पांची तंद्री भंगवायचे काम करीत असे. असेच एकदा आजोबांबरोबर रात्री घराकडे चालत येत असताना, ‘आबा, तुम्ही आजीलापण का नाही नेत हो पारावर गप्पा मारायला?’, असं मी त्यांना विचारलं तर ते खो-खो हसतच सुटले. आजी, पारावरचे मित्र, येणारे-जाणारे सगळ्यांना हा प्रसंग ते सांगत आणि तेही सगळे हसत. यात हसण्यासारखं काय हा प्रश्न तेव्हा मला पडला आणि आता थोडी मोठी झाल्यावर त्याचं उत्तर थोड्याफार प्रमाणात कळू लागलंय.
बायका दिवेलागणीच्या वेळी पारावर गप्पा मारत बसल्यात, हे चित्र हास्यास्पद वाटण्याचं कारण म्हणजे त्यांच्याकडे असा निवांत, मोकळा वेळ आहे ही कल्पनाच आपल्याला करवत नाही. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत स्त्रीने काही ना काही काम करतच राहावं, हे गृहीतक आपल्या मनात खोलवर रुजलंय. पुरुषांचा निवांत वेळ हा त्यांचा हक्क मानला जातो, तर स्त्रीचा निवांत वेळ हा चैनीचा, समजला जातो. म्हणूनच थकून-भागून घरी आलेल्या बाबांना आपण आधी पाणी देतो, आणि आईला मात्र, ‘‘किती उशीर गं आई, केव्हापासून वाट पाहतोय तुझी, भूक लागलीये खूप’’, असं सहज म्हणतो. या संदर्भात ‘स्त्री कामावरून आली की परत कामावर येते’ हे कुठेतरी ऐकलेलं वाक्य मला खूप समर्पक वाटतं. कारण विश्रांती किंवा रिकामा वेळ तिच्याकडे कधी नसतोच. ही मानसिकता पुरुषांची स्त्रियांबद्दल आहे आणि त्यामुळे त्यांना सतत कामात राहावं लागतं, असंही नाही. तरीही हे असं स्त्रियांचं ‘स्वतःला मोकळं न राहू’ देण्याचा प्रयत्न चालू असतो. त्यामुळे पूर्वी घरातलं बाकी सगळं काम संपवून दुपारच्या वेळी आजी गोधडी शिवायची, आता आई नवीन पाककृती करून बघते तर डॉक्टर असलेली बहीण वाचन करते. या सगळ्यामागे सूत्र एकच, वेळेचा सदुपयोग. आणि वेळेचा सदुपयोग म्हणजे सतत काही ना काही करत राहणे.
काहीच न करता शांतपणे बसून राहणे हा आपल्यातल्या कित्येकींना अक्षम्य गुन्हा वाटतो. अशावेळी मग काहीतरी करण्यासाठी, आणि कदाचित त्याहून अधिक, ‘‘काहीच न करण्याची’’ वेळ टाळण्यासाठी आपण कामं अक्षरशः उकरून काढतो !
आपण फक्त आपल्यापुरते
आपण या निवांतपणाला जाणीवपूर्वक टाळतो का, असा प्रश्न मला नेहमी पडतो. कारण असा निवांतपणा मिळाला की आपण विचार करू लागतो. आपल्या आवडी निवडी, छंद, जपलेली स्वप्नं, कधी काळी आवडलेली व्यक्ती झालेला अन्याय, मिळालेली वागणूक असं सगळं मग आठवायला लागतं. दिवसभराच्या धावपळीत जे विचार मागे राहतात, तेच या निवांत वेळेत मनाचा ताबा घेतात, अवघड प्रश्न विचारतात आणि अंतर्मुख करतात. अस्वस्थही करतात; पण ती अस्वस्थता आत्मभानाची असते. त्या क्षणी काही साध्य करायचं नसतं, काही सिद्ध करायचं नसतं, आपण फक्त आपल्यापुरते असतो. याच कारणामुळे निवांतपणा हा केवळ विश्रांतीचा प्रश्न राहात नाही. तो व्यक्तीच्या स्वातंत्र्याचा आणि स्व-ओळखीचा केंद्रबिंदू ठरतो.
आता मात्र बदलाची काही सूचक चिन्हं दिसू लागली आहेत. काही स्त्रिया जाणीवपूर्वक स्वतःसाठी वेळ राखून ठेवताना दिसतात, त्यावेळी कोणासाठीही उपलब्ध नसतात. हा वेळ एखाद्या छंदाचा असो, वाचनाचा असो, किंवा फक्त शांतपणे बसून राहण्याचा असो. तो वेळेच्या वापराबद्दलच्या प्रचलित समजुतींना दिलेला एक सूक्ष्म धक्का ठरतो.
म्हणूनच, ‘‘काहीच न करणं’’ ही कृती निष्क्रियता नसून स्वतःला ऐकण्याची, स्वतःच्या विचारांना जागा देण्याची आणि अंतर्मुख होण्याची प्रक्रिया आहे. म्हणूनच निवांत क्षण हे चैनीचे नाहीत, तर व्यक्तीच्या स्व-ओळखीचे आधारस्तंभ आहेत. स्वतःसाठीची गुंतवणूक आहे. यातून सृजनाच्या वाटा निर्माण होण्याचीही शक्यता आहे. आणि म्हणूनच आजही कधी संध्याकाळी निवांत बसले की मला पारावरच्या त्या गप्पा आठवतात आणि वाटतं, आजीला कधीच न मिळालेला तो निवांत वेळ, आपण मात्र स्वतःला जाणीवपूर्वक द्यायलाच हवा.