ढिंग टांग : मुद्दा, मुजोरी, मुदतवाढ!
esakal April 28, 2026 05:45 AM

महाराष्ट्रात राहणाऱ्या हरेकाला मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे. महाराष्ट्रात कामधंदा करणाऱ्याला तर ती बोलता आलीच पाहिजे. भलते लाड खपवून घेता कामा नयेत. दक्षिणेत गेलात, तर तिथे झक्कत तिथली भाषा बोलावी लागते. ती येत नसेल, तर खाणाखुणा योग्य पद्धतीने करून संवाद साधावा लागतो. मागल्या टायमाला आम्ही दक्षिणेत कुठेतरी गेलो असता, साधा ‘सुलभ’ पत्ता विचारीत होतो, पण खाणाखुणा चुकल्या. समोरील अण्णाने दातओठ खाऊन, जीभ चावत लुंगीच उचलायला घेतली. अनवस्था प्रसंग गुदरला. असो.

परप्रांतीय रिक्षावाल्यांस मराठी शिकवून सोडण्याचा जो निर्णय परिवहन मंत्र्यांनी घेतला आहे, त्याचे आम्ही स्वागत करतो. मायमराठी ही भाकरीची भाषा बनावी, यासाठी आजवर अनेक दिग्गज विचारवंत, साहित्यिकांनी आपले देह झिजविले. कथा-कादंबऱ्या, कविता लिहू लिहू मायमराठीची सेवा केली. परंतु, परिवहन मंत्र्यांकडे पाहून ‘तुम्ही तर यांच्याही पुढे गेलात?’ असे विनम्रपणे म्हणावेसे वाटते.

परिवहन मंत्र्यांनी आपल्या दालनात रिक्षा-टॅक्सी चालक-मालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून मराठीसक्तीचे महत्त्व विशद केले. पदाधिकाऱ्यांनी मुदतवाढ मागितली आहे. तीन महिन्याचे अर्भक तीन महिन्यात फाड फाड इंग्रजी बोलू शकते, तर मराठी का नाही? तरीही मुदतवाढ देण्याचा उदार दृष्टिकोन परिवहन मंत्र्यांनी स्वीकारला आहे.

आपले मीटर डाऊन करण्यापूर्वी रिक्षाचालकांनी मराठी भाषेचे मीटर डाऊन करणे आवश्यक आहे. मीटर डाऊन या इंग्रजी शब्दांना पर्यायी मराठी शब्द शोधण्याची चेष्टा आम्ही केली. (खुलासा : मुद्दाम परप्रांतीयांच्या भाषेत सांगितले. परप्रांतीय लोक चेष्टा करणे म्हणजे प्रयत्न करणे समजतात. काय हे?) खरे तर मुंबईत येण्यापूर्वीच परप्रांतियांनी कामचलाऊ मराठी शिकून आले पाहिजे. मुंबईत मराठी भाषा बोलता येत नसेल तर अडत नाही, हा संस्कार आधी नष्ट केला पायजेलाय.

रिक्षाचालकांची मुजोरीदेखील मराठी नसते, याला काय म्हणावे? गुदस्ता एका अमराठी रिक्षाचालकाने प्रस्तुत लेखकास ‘चार बंगल्याला येणार का?’ या साध्यासिंपल मराठी सवालाचे उत्तर हात उडवून एकही शब्द न बोलता उर्मटपणे ‘नही’ असे दिले. आमच्याजागी कोणी महाराष्ट्रसैनिक असता तर त्याने दोन थोतरीत ठेवून दिल्या असत्या. पण आम्ही पडलो नेमस्त पक्षाचे!! (ओळखा बरं तुम्हीच! अं, अं...करेक्ट! लब्बाड आहात!!) रिक्षाचालकांना मराठी येत नसेल तर आम्ही शिकवू, मग हवे तितके बोला, असा आमचा सौहार्दपूर्ण हेतू आहे. तथापि, रिक्षाचालकांशी कसे बोलावे, याचीही शिकवणी आम्ही पाशिंजर मंडळींना देऊ इच्छितो. इच्छुकांनी त्वरित (तुरंत लिहिणार होतो...वाचलो!) संपर्क साधावा.

आमची बेसिक मार्गदर्शक तत्त्वे खालीलप्रमाणे :

  • प्रवाशांनीही रिक्षा अथवा टॅक्सीचालकांशी मराठीतूनच प्रथम संवाद साधणे गरजेचे आहे. ‘पार्ला इस्ट चलेगा क्या?’ या प्रश्नाचे उत्तर देण्यास रिक्षा-टॅक्सीचालक बांधील असणार नाही.

  • पाशिंजर एकदा रिक्षा-टॅक्सीत बसला की त्यास ‘सीएनजी भरने का है’ असे सांगून पंपावर गाडी रांगेत उभी करणाऱ्याचे लायसन्स रद्द करणेत येईल, याची नोंद घ्यावी.

  • मराठी कितीही सक्तीची असली तरी ‘ओटीपी’ला पर्याय नाही. त्याऐवजी ‘एकवेळ संकेतांक’ वगैरे मराठी पर्याय शोधत टाइम खोटी करू नये. ओटीपी इज ऑलवेज ओटीपी!! ओके?

  • रिक्षा-टॅक्सीचालकांना विविध साहित्य संस्थांच्या साह्याने मराठी शिकवण्याचा परिवहन मंत्र्यांचा मानस आहे. यातून मराठी भाषेला भविष्यात काही लेखक मिळाल्यास आश्चर्य वाटून घेऊ नये.

  • रिक्षाचालकाशी आपण प्रवास करण्याबाबत बोलतो आहोत, याचे भान ठेवावे. आपला हेतू प्रवासाचे गंतव्यस्थान समजावण्याचा आहे, रिक्षावाल्यास वाजवण्याचा नाही, याचे भान सर्वांनी ठेवणे आवश्यक आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.