केडगाव - तरणीताठी पोर गेली अन् प्रपंच मोडला. आईच्या आठवणीनं लेकरं आय आय करत्यात. त्यांची आय जाऊन मंगळवारी (ता. २८) चार दिवस झाले. दिवसा खेळत्यात कशी तरी, पण रात्रीची पोरं रडायला लागली की जीव तुटतो. काय करावं ते सुचत नाय, असे जयाबाई हाके सांगत होत्या.
खोर (ता. दौंड) येथील रंजना बाबू केसकर (वय-२२) ही मेंढपाळ महिला केडगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करताना पोटात रक्तस्राव होऊन नुकतीच मृत्यूमुखी पडली. रंजना यांना पियुश (वय-२) व आरोही (वय-१) अशी मुले आहेत. दरम्यान, त्यांच्या नातेवाईक असलेल्या जयाबाई हाके यांनी कुटुंबाची व्यथा मांडली. सांत्वनासाठी नातेवाईक गोळा झाले होते. सर्वजण शांत होते. अनेकांना लेकरांचे कसे होणार हीच चिंता होती. या शांततेतही जयाबाई पोटतिडकीने व्यवस्थेवर आसूड ओढत होती.
जयाबाई म्हणाल्या, हलगर्जीपणाची डॅाक्टरला शिक्षा झाली पाहिजे. कदम डॅाक्टर घाईघाईत आपरेशन करत होते. त्या घाईत चुकीची नस कापल्याने पोरगी दगावली आहे. बाबू केसकरचे आजोबा नथू केसकर म्हणाले, आमचा तर वाडाच मोडून पडला. आता पोरानं श्यात बघायचं की, बकरी वळायची की पोरं संभाळायची.
वाढदिवसापूर्वीच वर्षाची मुलगी पोरकी
रंजना यांची लहान मुलगी आरोही हिचा मंगळवारी (ता. २८) पहिला वाढदिवस होता. पण नियतीनं पहिल्या वाढदिवसालाच तिला पोरकं केले होते. आज आरोहीची आई असती तर वाढदिवस आनंदात साजरा झाला असता. पण ते नियतीला मान्य नव्हते. घरापुढे आरोहीला खेळताना पाहून उपस्थितांना हळहळ वाटत होती.