सटाणा - शहरालगत औंदाणे शिवारातील यशवंत नगर परिसरात घडलेल्या स्टेट बँकेच्या एटीएम चोरीप्रकरणाचा अवघ्या काही दिवसांत छडा लावत सटाणा पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. अत्यंत शिताफी, वेगवान हालचाल आणि अचूक नियोजनाच्या जोरावर पोलिसांनी थेट उत्तर भारतात जाऊन दोन आरोपींना जेरबंद करत आपल्या कार्यक्षमतेची पुन्हा एकदा प्रचिती दिली आहे.
ता. १० जानेवारी २०२६ रोजी पहाटे तीन वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी शहरालगत असलेल्या औंदाणे शिवारातील साक्री-शिर्डी राष्ट्रीय महामार्गावरील यशवंत नगर परिसरातील एटीएम मशीन लक्ष्य करत ते उखडून वाहनाच्या सहाय्याने पळवून नेले होते. सकाळी घटना उघडकीस येताच परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. विशेष म्हणजे, पोलीस ठाण्यापासून अगदी नजीकच्या अंतरावर ही धाडसी चोरी घडल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले होते.
या गंभीर घटनेनंतर पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथकाची तातडीने स्थापना करण्यात आली. सीसीटीव्ही फुटेजचे बारकाईने विश्लेषण, तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा माग काढत थेट उत्तर भारत गाठले. नियोजनबद्ध सापळा रचून दोन आरोपींना अटक करण्यात पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांच्या पथकाला मोठे यश आले. ही कारवाई सटाणा पोलिसांच्या धाडस आणि तपास कौशल्याचे उत्तम उदाहरण ठरली आहे.
प्राथमिक चौकशीत आरोपींकडून महत्त्वाची माहिती समोर आली असून, आणखी तीन संशयितांची नावे निष्पन्न झाली आहेत. त्यामुळे या गुन्ह्यामागे आंतरराज्य टोळी कार्यरत असल्याची शक्यता बळावली आहे. उर्वरित आरोपींच्या अटकेसाठी पोलीस पथके विविध ठिकाणी रवाना झाली असून, संपूर्ण रॅकेट उघड करण्याच्या दिशेने तपास वेगाने सुरू असल्याचे पोलिस निरीक्षक श्री. पाटील यांनी स्पष्ट केले. अल्पावधीत गुन्ह्याचा छडा लावून आरोपींना जेरबंद करणाऱ्या या कारवाईमुळे पोलीस निरीक्षक योगेश पाटील आणि त्यांच्या संपूर्ण पथकावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
प्रतिक्रिया -
गुन्हा कितीही क्लिष्ट असला तरी त्यामागील धागेदोरे शोधून काढणे हेच आमचे कर्तव्य आहे. अत्याधुनिक तांत्रिक तपास, अचूक नियोजन आणि पथकातील प्रत्येक सदस्याच्या समन्वयातून आम्ही आरोपींपर्यंत पोहोचलो. नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत अशा आंतरराज्य गुन्हेगारी जाळ्यांचा पूर्णपणे पर्दाफाश करण्यासाठी आमचा तपास पुढेही तितक्याच काटेकोरपणे सुरू राहील.
- योगेश पाटील, पोलीस निरीक्षक, सटाणा