MI vs SRH: सूर्यकुमार यादवचा फुसका बार, आयपीएल 2026 स्पर्धेत मुंबई इंडियन्ससाठी अवघड जागेचं दुखणं
admin April 30, 2026 12:26 AM

आयपीएल 2026 स्पर्धेत मुंबई इंडियन्सला विजयी ट्रॅकवर परतण्याशिवाय पर्याय नाही. आता यापुढे होणारा प्रत्येक सामना जिंकणं भाग आहे. नाही तर प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर फेकला जाईल. मुंबई इंडियन्सने आतापर्यंत खेळलेल्या सात पैकी 5 सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. तर दोन सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे प्लेऑफसाठी 16 गुणांचं गणित सोडवायचं तर प्रत्येक सामना जिंकणं आवश्यक आहे. त्यामुळे आठव्या सामन्यापासून हार्दिक पांड्याने विजयासाठी प्रयोग सुरू केले आहेत. रोहित शर्माच्या गैरहजेरीत ओपनिंगसाठी नव्या खेळाडूंना संधी दिली आहे. रिकल्टन आणि विल जॅक्स यांनी सलामी दिली. या दोघांनी चांगली सुरूवात करून दिली. पहिल्या विकेटसाठी 93 धावांची भागीदारी केली. विल जॅक्स 43 धावा करून बाद झाला आणि धावगती वाढण्याची जबाबदारी सूर्यकुमार यादववर आली. पण या सामन्यातही त्याने निराशा केली.

मुंबई इंडियन्स संघाची धावसंख्या 93 असताना सूर्यकुमार यादव फलंदाजीला आला. संघाची स्पर्धेतील स्थिती नाजूक असल्याने त्याच्याकडून अपेक्षा होत्या. त्यात मुंबईचं वानखेडे स्टेडियम हे होमग्राउंड.. असं असूनही त्याला संघासाठी योगदान देता आलं नाही. सूर्यकुमार यादव पुन्हा एकदा फेल गेला. सूर्यकुमार यादवने रिकल्टनसोबत 8 चेंडूत फक्त 17 धावांची भागीदारी केली आणि बाद झाला. सूर्यकुमार यादवने 5 चेंडूंचा सामना करत एक चौकारासह 5 धावा केल्या. इशान मलिंगाच्या गोलंदाजीवर पूल मारताना चुकला आणि अभिषेक शर्माने त्याचा झेल पकडला.

आयपीएल स्पर्धेत सूर्यकुमार यादवने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध 32 चेंडूत 51 धावा, चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध 22 चेंडूत 36, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध 18 चेंडूत 33 धावा, कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध 13 चेंडूत 16 धावा, गुजरात टायटन्सविरुद्ध 12 चेंडूत 15, राजस्थान रॉयल्सविरुद्ध 9 चेंडूत 5, तर पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यात खातंही खोलता आलं नाही.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.