वादळी वाऱ्यासह पावसामुळं भिंत कोसळून मोठा अपघात, बंगळुरुमध्ये सात जणांचा मृत्यू तर अनेकजण जखमी
एबीपी माझा वेब टीम April 30, 2026 01:13 AM

Bengaluru News : कर्नाटकातील  बंगळुरुमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. आज सायंकाळी शिवाजीनगर येथील 'बोरिंग आणि लेडी कर्झन रुग्णालया'ची संरक्षक भिंत कोसळली आहे. यामध्ये सहा वर्षांच्या एका मुलीसह सात जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. तर अन्य सात जण जखमी झाले आहेत. मुसळधार पाऊस आणि अनेक दशके जुन्या असलेल्या या भींतीवर बांधकामाचा अतिरिक्त भार पडल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचे मानले जात आहे.

सुमारे 12 फूट उंच आणि एक फूट जाड असलेली भिंत पावसामुळं कोसळली

मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे 12 फूट उंच आणि एक फूट जाड असलेली भिंत सायंकाळी 5.45च्या सुमारास कोसळली. ज्यामुळे 10 ते 12 अधिक लोक अडकून पडले. त्यापैकी काही जण पदपथावर आपली दुकाने मांडणारे विक्रेते होते, तर काही खरेदीदार किंवा पावसापासून आश्रय घेतलेले वाटसरू होते. बचाव पथक घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच, स्थानिक रहिवाशांनी पीडितांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

मृताच्या नातेवाईकांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर

पोलीस उपायुक्त (पूर्व) विक्रम अमाथे यांनी सांगितले की, मृतांमध्ये दोन महिला, चार पुरुष आणि एका मुलीचा समावेश आहे. जखमी झालेल्या सात जणांपैकी तिघे मूळचे केरळचे रहिवासी असून ते बंगळुरूला भेट देण्यासाठी आले होते, असेही त्यांनी नमूद केले. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी रुग्णालयात जाऊन पीडितांची विचारपूस केली आणि प्रत्येक मृताच्या नातेवाईकांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली. निष्काळजीपणाबद्दल रुग्णालयाचे कर्मचारी आणि 'ग्रेटर बंगळुरू ऑथॉरिटी' (GBA) च्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. या घटनेस कारणीभूत ठरलेल्या परिस्थितीबाबत सविस्तर चौकशी अहवाल सादर करण्याचे, जबाबदारी निश्चित करण्याचे आणि निष्काळजी आढळणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी GBA च्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.

बंगळुरूचे पोलीस आयुक्त सीमांत कुमार सिंह यांनी सांगितले की, घटनास्थळावरून सर्व ढिगारा हटवण्यात आला आहे. बचावकार्यास विलंब झाला; कारण आजूबाजूच्या परिसरात झाडे पडल्यामुळे निर्माण झालेल्या वाहतूक कोंडीत अग्निशमन दलाच्या चार गाड्या अडकल्या होत्या, ज्यामुळे घटनेनंतरच्या सुरुवातीच्या अत्यंत महत्त्वाच्या काही मिनिटांत घटनास्थळी पोहोचण्यात अडथळा निर्माण झाला होता. इमारत कोसळल्यानंतर अवघ्या सात मिनिटांतच आपत्कालीन सेवांना मदतीसाठी तब्बल 27 फोन आले, ज्यावरून तिथे निर्माण झालेल्या घबराटीच्या तीव्रतेचा अंदाज येतो. बचावकार्यादरम्यान पुढील धोके टाळण्याच्या उद्देशाने, खबरदारीचा उपाय म्हणून 'बंगळुरू वीज पुरवठा कंपनी' (Bescom) ने त्या परिसरातील वीजपुरवठा खंडित केला.

या भागात सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली आणि त्यासोबतच मेघगर्जनेसह वादळही आले. सायंकाळी 5.45 च्या सुमारास ती भिंत अचानक कोसळली. ढिगाऱ्याखाली अडकलेले मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरु आहे. यामध्ये अनेक लोक जखमी झाले आहेत. काहींना कदाचित आपले पायही गमवावे लागल्याची माहिती मिळत आहे. 

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.