'एकाच ठिकाणी 5 तासांपासून…', पुण्याला निघाली अन् वाहतूक कोंडीत अडकली सोनाली कुलकर्णी! VIDEO शेअर करत दाखवली भीषण परिस्थिती
जयदीप मेढे April 30, 2026 12:13 PM

मुंबई : सायन पनवेल महामार्गावर मानखुर्द जवळ निर्माण मोठ्या प्रमाणावर झालेली वाहतूक कोंडी (Mankhurd Traffic Jam) अखेर रात्री उशिरा पोलिसांनी सुरळीत केल्याचं पाहायला मिळालं. मंगळवारी रात्री मानखुर्द जवळ (Mankhurd Traffic Jam) सुरू असलेल्या रस्त्याच्या कामासाठी आणलेल्या क्रेनचा एक भाग कोसळला आणि त्या घटनेत एका नागरिकाचा मृत्यू झाला. त्यानंतर सदर क्रेनचा भाग काढण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू झाले आणि यामुळे निर्माण झालेल्या वाहतूक कोंडीचा (Mankhurd Traffic Jam) फटका मुंबईहून पुण्याच्या दिशेने प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठ्या प्रमाणावर बसला. या मार्गावरून १५ ते २० मिनिटे अंतरासाठी जवळपास ४ ते 6 तास वाहतूक कोंडीत अडकावे लागले होते, यामुळे अनेकांनी सोशल मिडीयावर संताप व्यक्त केला, हाच अनुभव मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीला देखील आला. ती देखील ५ तास या वाहतूक कोंडीत अडकलेली होती. 

Mankhurd Traffic Jam :  प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय झाली

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी काल (बुधवारी, ता २९) रात्री पुण्याकडे निघाली होती. पण, या प्रवासादरम्यान मानखुर्द ब्रिजवर ती जवळपास पाच तास वाहतूक कोंडीत अडकली. एकाच ठिकाणी पाच तास अडकून पडल्याने तिच्यासह अन्य प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय झाली. याचा व्हिडीओ अभिनेत्री सोनालीने तिच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. तसेच मानखुर्द ब्रिजवर कशाप्रकारे वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या, हेदेखील तिने तिच्या व्हिडीओमध्ये दाखवले आहे.

Mankhurd Traffic Jam : सोनालीने तिच्या सोशल मिडीयावरती व्हिडीओ शेअर करत म्हटलं 

सोनालीने तिच्या सोशल मिडीयावरती व्हिडीओ शेअर करत म्हटलं की, “नमस्कार, मी आत्ता मानखुर्द ब्रिजवरती आहे…आता जवळपास पाच तास झाले आहेत, आणि गेल्या पाच तासांपासून मी याठिकाणी वाहतूक कोंडीमध्ये अडकले आहे. मी पुण्याला चालले होते…पण, तुम्ही माझ्या पुढे आणि मागे, आजूबाजूला कशाप्रकारे ट्राफिक जाम झालं आहे ते तुम्ही पाहून शकता. आम्ही ट्राफिक कंट्रोल टीमला सुद्धा फोन केला होता पण, त्यांचं असं म्हणणं आहे की, पेशन्स ठेवा. कारण, ही वाहतूक कोंडी खूप मोठी आहे. त्यांना सुद्धा कल्पना नाहीये की, ही वाहतूक कोंडीची समस्या दूर होऊन सगळं कधी पूर्ववत होईल. आम्ही आता परतही जाऊ शकत नाही. जर कोणी विरुद्ध दिशेने मागे जात असाल, तर पुढे काय झालं आहे, हे सांगा, किंवा आमच्यासारख्या प्रवाशांची मदत करा. एकाच ठिकाणी ५ तासांपासून अडकणं हे अतिशय भितीदायक आहे, असंही पुढे तिने म्हटलं आहे.”

सोनालीच्या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट करत संताप व्यक्त केला आहे, त्याचबरोबर अभिनेत्री गौतमी देशपांडे हिने देखील सोनालीच्या पोस्टवर कमेंट करत “मी सुद्धा याच वाहतूक कोंडीत अडकलेय, काळजी घ्या” असं म्हटलं आहे. यावर नेटकऱ्यांनी सुद्धा असंख्य कमेंट्स करत या वाहतूक कोंडीबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sonali Kulkarni (@sonalikul)

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.