दरमहा 50000 पगार असेल तर हातात किती रक्कम येणार? नव्या नियमांमुळे तुमच्या खिशावर काय परिणाम होण
Marathi May 01, 2026 02:25 PM

नवीन कामगार कायदे 2026: केंद्र सरकारकडून लागू करण्यात येणाऱ्या ‘न्यू लेबर कोड 2026’ मुळे खासगी क्षेत्रातील नोकरदारांच्या पगार संरचनेत मोठे बदल होणार आहेत. या नवीन नियमावलीचा सर्वात मोठा परिणाम कर्मचाऱ्यांच्या मासिक पगारावर आणि त्यांच्या भविष्य निर्वाह निधीवर (PF) होणार आहे. पगार 50 हजार रुपये असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत हे बदल नेमके कसे असतील, याबाबत जाणून घेऊयात…

New Labour Laws 2026: काय आहे 50 टक्क्यांचा नियम?

नव्या कायद्यानुसार, कोणत्याही कर्मचाऱ्याचा ‘बेसिक पे’ (Basic Salary) आणि महागाई भत्ता (DA) हा त्याच्या एकूण वार्षिक पगाराच्या (CTC) किमान 50 टक्के असणे अनिवार्य असेल. सध्या अनेक कंपन्या पीएफ कपात कमी करण्यासाठी बेसिक पगार कमी ठेवतात आणि भत्ते (Allowances) जास्त दाखवतात. आता मात्र 50 टक्क्यांहून अधिक असलेले इतर सर्व भत्ते थेट तुमच्या बेसिक सॅलरीमध्ये जोडले जातील.

New Labour Laws 2026:  50 हजार रुपये पगार असलेल्या कर्मचाऱ्याचे गणित

जर एखाद्या कर्मचाऱ्याचा दरमहा पगार 50 हजार रुपये असेल आणि सध्या त्याचा बेसिक पगार 20 हजार रुपये असेल, तर नव्या कायद्यानुसार तो किमान 25 हजार रुपये करावा लागेल.

1. मासिक पगारात घट: बेसिक पगार वाढल्यामुळे त्यातून कापली जाणारी पीएफची (PF) रक्कमही वाढणार आहे. पूर्वी 20 हजार बेसिकवर जेवढी कपात होत होती, त्याऐवजी आता 25 हजार बेसिकवर 12 टक्के दराने पीएफ कापला जाईल. यामुळे दरमहा हातात मिळणारा पगार (Take-home Salary) साधारणपणे 600 ते 800 रुपयांनी कमी होऊ शकतो. 50 हजार पगार असणाऱ्या व्यक्तीला आता साधारण 44 हजार 400 रुपयांच्या आसपास नेट पगार मिळेल.

२. ग्रॅच्युइटीचा मोठा लाभ: हातात येणारा पगार थोडा कमी होणार असला, तरी निवृत्तीनंतर किंवा नोकरी सोडताना मिळणाऱ्या ग्रॅच्युइटीच्या रकमेत मोठा फायदा होणार आहे. ग्रॅच्युइटीची गणना मूळ पगारावर (Basic Pay) केली जाते. बेसिक वाढल्याने एका वर्षाच्या सेवेची ग्रॅच्युइटी अंदाजे 14 हजार 423 रुपयांपर्यंत जाईल. म्हणजेच पाच वर्षांची सेवा पूर्ण केल्यास 72 हजार रुपयांहून अधिक रक्कम ग्रॅच्युइटी म्हणून मिळेल.

३. निवृत्तीनंतरची पुंजी वाढणार: दरमहा पीएफमध्ये होणारी अधिकची कपात ही एक प्रकारे सक्तीची गुंतवणूक ठरणार आहे. पीएफमध्ये कर्मचाऱ्यासोबतच कंपनीचाही वाटा वाढणार असल्याने, निवृत्तीच्या वेळी चक्रवाढ व्याजासह तुमच्या खात्यात मोठी रक्कम जमा झालेली असेल.

New Labour Laws 2026: भविष्यातील सुरक्षेला प्राधान्य

थोडक्यात सांगायचे तर, नवीन कामगार कायदे नोकरदारांच्या सद्यस्थितीतील खर्चापेक्षा त्यांच्या भविष्यातील आर्थिक सुरक्षिततेवर अधिक भर देतात. आज खिशात थोडी कमी रक्कम आली तरी, नोकरी सोडताना किंवा निवृत्तीच्या वेळी मिळणारा निधी हा जुन्या पद्धतीपेक्षा कितीतरी पटीने जास्त आणि सुरक्षित असणार आहे.

आणखी वाचा

LPG Cylinder Price Hike: व्यावसायिक सिलिंडरच्या दरात तब्बल 993 रुपयांची वाढ; 19 किलोच्या सिलिंडरसाठी मोजावे लागणार 3 हजार 71 रुपये, निवडणुका संपताच महागाईचा तडाखा

आणखी वाचा

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.