Mumbai Local Block: नीट परीक्षेसाठी रविवारी दिवसा मेगाब्लॉक रद्द; मध्य व ट्रान्स हार्बर मार्गावर मध्यरात्री विशेष ब्लॉक
esakal May 01, 2026 11:45 PM

मुंबई: नीट युजी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी मध्य रेल्वेकडून रविवारी (ता.३ ) दिवसाचा मेगाब्लॉक रद्द करण्यात आला आहे. मात्र, आवश्यक देखभाल व अभियांत्रिकी कामांसाठी शनिवारी-रविवारी मध्य रात्री मुख्य मार्गावर आणि ट्रान्स हार्बर मार्गावर विशेष ब्लॉक घेण्यात येणार असून, या कालावधीत लोकल सेवांवर मोठा परिणाम होणार आहे.

सीएसएमटी ते विद्याविहार दरम्यान अप व डाउन धीम्या मार्गांवर रविवारी रात्री १२.०५ ते पहाटे ५.०५ या वेळेत ब्लॉक राहील. या दरम्यान सीएसएमटीहून सुटणाऱ्या धीम्या मार्गावरील गाड्या विद्याविहारपर्यंत जलद मार्गावर वळवण्यात येतील. त्या भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकांवर थांबतील. घाटकोपरकडून येणाऱ्या अप गाड्यांनाही याच पद्धतीने जलद मार्गावर वळवून प्रमुख स्थानकांवर थांबे देण्यात येणार आहेत. ब्लॉकपूर्वी डाउन दिशेची शेवटची लोकल शनिवारी रात्री ११.१६ वाजता सीएसएमटीहून टिटवाळाकडे सुटेल, तर अप दिशेची शेवटची गाडी कल्याणहून शनिवारी रात्री १०.२२ वाजता सुटेल. ब्लॉकनंतर सीएसएमटीहून कसाराकडे पहिली लोकल रविवारी पहाटे ५.०७ वाजता, तर टिटवाळाहून सीएसएमटीकडे पहिली गाडी रविवारी पहाटे ४.१२ वाजता धावेल.

ट्रान्स हार्बर मार्गावर पाच तासांचा ब्लॉक

दरम्यान, ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे ते वाशी/नेरुळ दरम्यान रात्री ११.४५ ते पहाटे ४.४५ या वेळेत दोन्ही दिशेने सेवा पूर्णपणे बंद राहतील. या कालावधीत काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. ब्लॉकपूर्वी ठाणे-पनवेल शेवटची लोकल शनिवारी रात्री ११.१४ वाजता सुटेल, तर वाशीहून ठाण्याकडे शेवटची गाडी शनिवारी रात्री १०.४५ वाजता धावेल. ब्लॉकनंतर पहिली सेवा ठाणेहून पनवेलकडे रविवारी पहाटे ५.१२ वाजता, तर पनवेलहून ठाण्याकडे पहाटे ४.३३ वाजता सुरू होईल.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.