दोन लेकींची लग्नं केली, कर्ज फेडण्यासाठी सासूने चक्क मोठ्या जावयाच्या घरात डल्ला मारला! आता रवानगी थेट जेलमध्ये
विलास अध्यापक, एबीपी माझा May 02, 2026 07:43 PM

Belgaum Crime News: दोन मुलींच्या लग्नामुळे झालेले कर्ज फेडण्यासाठी सासूने चक्क मोठ्या जावयाच्या घरातील साडे सोळा लाखाच्या दागिन्यावर डल्ला मारल्याची धक्कादायक घडना घडली. जावयाने घरातील दागिने चोरी झाल्याची टिळकवाडी पोलीसात तक्रार दिली. पोलिस तपासात सासूनेच दागिने चोरल्याचे उघड झाले. पोलिसांनी सासूची रवानगी हिंडलगा जेलला केली.

जावयाच्या बेडरूममधील 110 ग्रॅम सोन्याचे दागिने चोरले

बेळगावातील अनगोळ येथील यल्लाप्पा इराप्पा कम्मार हे आपल्या पत्नी सोबत लग्नाला गेले होते. यावेळी त्यांची सासू उज्वला कम्मारने आपला नातेवाईक शिवा अप्पयनवरच्या मदतीने जावयाच्या बेडरूममधील तिजोरी खोलून 110 ग्रॅम सोन्याचे दागिने चोरले. लग्नाहून आल्यावर जावई यल्लापाने पैसे ठेवण्यासाठी तिजोरी उघडली असता तिजोरीतील दागिने गायब झाल्याचे समजले. या संबंधी सासू उज्वलाला विचारल्यावर माहित नसल्याचे सांगितले.

आरडाओरड करून गोंधळ घातला

नंतर यल्लापाने टिळकवाडी पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी चौकशीसाठी उज्वलाला बोलावले असता आरडाओरड करून गोंधळ घातला. नंतर पोलिसांनी कसून चौकशी केल्यावर उज्वलाने नातेवाईक शिवा अप्पयनवरच्या मदतीने तिजोरी खोलून दागिने चोरल्याची कबूली दिली. पोलिसांनी उज्वला आणि शिवा यांच्याकडून नेकलेस, गंठण, अंगठी आणि अन्य सोन्याचे दागिने असे 110 ग्रॅम वजनाचे दागिने जप्त केले.

चार वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार केल्याची घटना

दरम्यान, पुण्यातील भोर तालुक्यात धक्कादायक घटना घडली आहे. भोर तालुक्यातील एका गावात एका चार वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. यानंतर आरोपीने चिमुरडीची हत्या केली आहे. या घटनेनंतर मुलीचा मृतदेह पोलीस स्टेशनच्या बाहेर ठेवण्यात आला आहे. गावकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन सुरु केलं आहे.  कृत्य करणाऱ्या नराधमाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. 

आरोपीने अत्याचार करुन दगडाने चिमुकलीची हत्या केल्याची माहिती

आरोपीने अत्याचार करुन दगडाने चिमुकलीची हत्या केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.  65 वर्षीय नराधमाने अत्याचार केल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, स्थानिकांच्या म्हणण्यानुसार एका 65 वर्षीय व्यक्तीने, घरासमोर खेळणाऱ्या चिमुकलीला गोठ्यात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार करून, दगडाने ठेचून तीचा खून केल  आणि नंतर तिचा मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली झाकून ठेवला होता. दुपारी चिमुकली न दिसल्यानं तिची शोधाशोध केल्यानंतर चिमुकली गोठ्यात मृत अवस्थेत आढळली. त्यानंतर परिसरातले cctv फुटेज चेक केल्यानंतर आरोपी चिमुकलीला गोठ्याच्या दिशेने घेऊन जाताना दिसला त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार ही चिमुकली आजीच्या घरी सुट्टीला आली होती.

इतर महत्वाच्या बातम्या

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.