Pune Crime News : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे चार वर्षाच्या मुलीवर अत्याचार झाल्यानंतर तिची हत्या करण्यात आली आहे. या घटनेनंतर नातेवाईक आक्रमक झाले आहेत. या घटनेनंतर ग्रामस्थांसह नातेवाईक आक्रमक झाले आहेत. पुण्याच्या नवले पुलावर आंदोलकांनी ठिय्या मांडला आहे. जोपर्यंत न्याय मिळत नाही, आरोपीला शिक्षा होत नाही तोपर्यंत इथून हलणार नाही अशी भूमिका चिमुरडीच्या नातेवाईकांनी घेतली होती. दरम्यान, या घटनेवर मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ दिग्दर्शक आणि अभिनेते प्रवीण तरडे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. आरोपी असलेल्या नराधमाचा एन्काऊंटर झालं तरच हे सरकार छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचं आहे अशी प्रतिक्रिया प्रवीण तरडे यांनी दिली आहे.
नसरापूर लैंगिक अत्याचार प्रकरणाबाबत अभिनेते प्रवीण तरडे आक्रमक झाले आहेत. नराधमाचा एन्काऊंटर झालं तरच हे सरकार छत्रपती शिवाजी महाराजांचा विचारांचं आहे असं म्हणत त्यांनी फेसबुक पोस्ट केली आहे. एन्काऊंटर झालं नाही तर भोरच्या मावळ्यांनी कायदा हातात घ्यावा, अशी आक्रमक पोस्ट प्रवीण तरडे यांनी केली आहे.
भोर तालुक्यातील नसरापूरमध्ये शुक्रवारी, 1 मे रोजी एका 4 वर्षांच्या चिमुकलीवर 65 वर्षीय नराधमाने अत्याचार करून तिची हत्या केली. नराधमाला पोलिसांनी अटक केली असली तरी चिमुकलीचे नातेवाईक आणि ग्रामस्थ प्रचंड संतापले. त्यांनी पुण्यातील नवले पुलाजवळ शनिवारी संध्याकाळी साडेसहा वाजल्यापासून ठिय्या आंदोलन सुरू केलं. चिमुकलीचा मृतदेह रुग्णवाहिकेत ठेवून त्यांनी ठिय्या आंदोलन केलं.
नसरापूर आंदोलकांनी ऐन गर्दीच्या वेळी पुणे-बंगळुरू महामार्ग रोखून धरल्यामुळे पुण्यात मोठी वाहतूक कोंडी झाली. आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा द्या, अशी मागणी या आंदोलकांनी केली. या आंदोलकांची समजूत काढण्यासाठी पुणे पोलीस आयुक्त दाखल झाले. त्यांनी आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, आंदोलकांनी माघार घेण्यास नकार दिला.
नसरापूरच्या चिमुकलीला न्याय द्या आणि नराधमाला फाशी द्या या मागणीसाठी लोकांनी आंदोलन केलं. यासाठी त्या चिमुकलीचा मृतदेहही त्या ठिकाणी आणण्यात आला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी चिमुकलीच्या कुटुंबाला फोन करावा आणि नराधमाला फाशी देत असल्याचं जाहीर करावं, अशी मागणी आंदोलकांनी केली. आंदोलकांच्या आक्रमकतेमुळे या ठिकाणी मोठी गर्दी झाल्याचं दिसून आलं. परिणामी नवले पूलाच्या दोन्ही बाजूने वाहतूक कोंडी झाली. सुमारे चार तास हे आंदोलन सुरू होतं. यावेळी पुण्याचे आयुक्तही त्या ठिकाणी आले आणि त्यांनी आंदोलकांशी, चिमुकलीच्या कुटुंबीयांशी चर्चा केली.