>> सुधाकर हेमनर
शिकण्याची जिद्द असेल, तर वय कधीच आडवे येत नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. अशाच संघर्षातून उभा राहिलेला एक प्रेरणादायी प्रवास म्हणजे शोभा नरवटे यांची यशोगाथा. शोभा नरवटे आणि त्यांचा मुलगा सार्थक हे दोघेही बारावी परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. विशेष म्हणजे हे माय लेक विज्ञान शाखेतून उत्तीर्ण झाले आहेत.
कधीकाळी बारावीच्या उंबरठ्यावर उभे राहूनही परिस्थितीमुळे परीक्षा देता न आलेली एक विद्यार्थिनी आणि आज त्याच बारावीच्या यशशिखरावर आपल्या मुलासोबत उभी असलेली एक आई! शोभा नरवटे यांचं शिक्षण बारावीपर्यंत पोहोचले होते; मात्र प्रकृती अस्वास्थ्य. ग्रामीण भागातील मर्यादा आणि नंतर झालेले लग्न या सगळ्यांमुळे त्यांना परीक्षा देता आली नाही. त्यानंतर पतीच्या नोकरीमुळे गावापासून कोसो दूर म्हणजेच हिंगणघाट (जि. वर्धा) येथे राहावे लागले.
ज्ञान असूनही प्रमाणपत्र नसल्याची खंत शोभा नरवटे यांच्या मनात कायम होती. पण ही खंत त्यांनी जिद्दीमध्ये बदलली. शिक्षणासाठी वय नसते, जिद्द आणि इच्छाशक्तीच सर्वात मोठी ताकद असते, हा विचार मनात ठेवत त्यांनी पुन्हा पुस्तक हातात घेतले. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने १७ नंबर फॉर्मच्या माध्यमातून अर्धवट शिक्षण पूर्ण करण्याची संधी उपलब्ध करून दिली आणि हीच संधी त्यांनी आयुष्य बदलण्यासाठी वापरली. त्यांचा मुलगा सार्थकही याच वर्षी बारावीच्या परीक्षेला बसत होता. आई आणि मुलगा एकाच उद्दिष्टासाठी झटत होते.
शोभा नरवटे यांनी अहमदपूर तालुक्यातील सोनेगाव सांगवी येथील अहिल्यादेवी होळकर विद्यालयातून बारावी विज्ञान शाखेतून परीक्षा दिली. निकालाचा दिवस उजाडला आणि दोघांनीही बारावी उत्तीर्ण होऊन एक अनोखा विक्रम घडवला. आई शोभा यांना ४८ टक्के तर मुलगा सार्थकला ७१. ६७ टक्के मार्क मिळाले व अनेक वर्षांची अपूर्णता, खंत आणि प्रतीक्षा एका क्षणात संपली.
निकाल पाहताच शोभा यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू दाटले. त्यांच्या चेहऱ्यावरचे समाधान आणि अभिमान शब्दात मांडणे कठीण आहे. या यशामागे त्यांचे पती परमेश्वर नरवटे यांनी दिलेली साथ आणि सततचे प्रोत्साहन खूप मोलाचे ठरले, असे त्यांनी सांगितले. कठीण काळात त्यांनी दिलेला आधारच आजच्या यशाचा भक्कम पाया ठरला, असेही त्या म्हणाल्या.





