पुणे भोर क्राईम न्यूज: पुणे (Pune) जिल्ह्यातील भोर (Bhor) तालुक्यातील नसरापूर येथे 4 वर्षांच्या चिमुकलीवर झालेल्या अमानवीय अत्याचार आणि हत्येच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या घटनेचा संपूर्ण महाराष्ट्रातून तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे. आता अखेर महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाला जाग आली असून, आयोगाचे अध्यक्ष ॲड. संजय पुराणिक यांनी या घटनेचा तीव्र निषेध करत पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी ठोस पावले उचलण्याचे आश्वासन दिले आहे.
1 मे रोजी महाराष्ट्र दिनी 65 वर्षीय नराधमाने 4 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या केली होती. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून शिवाजीनगर न्यायालयाने त्याला 7 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. मात्र, या घटनेमुळे स्थानिकांमध्ये तीव्र रोष आहे. आरोपीला कठोर शिक्षा आणि शासनाकडून ठोस आश्वासनाच्या मागणीसाठी शनिवारी रात्री नसरापूरच्या ग्रामस्थांनी पीडित चिमुकलीचा मृतदेह थेट पुण्यातील नवले पुलावर आणला. या आंदोलनामुळे पुणे-बेंगळुरू महामार्गावरील वाहतूक तब्बल चार तास ठप्प झाली होती. पोलिसांनी आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र आंदोलक आपल्या मागणीवर ठाम होते. अखेर रात्री उशिरा पोलिसांनी बळाचा वापर आणि लाठीमार करत आंदोलकांना पांगवले, त्यानंतर रात्री उशिरा चिमुकलीवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
या प्रकरणावर बोलताना बालहक्क आयोगाचे अध्यक्ष ॲड. संजय पुराणिक म्हणाले की, नसरापूर येथील छोट्या बालिकेसंदर्भात झालेली घटना दुदैवी आणि संतापजनक आहे. कायद्याच्या चौकटीत आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा मिळावी तसेच बालिकेच्या कुटुंबियांना शासनाकडून सहकार्य केले जाईल यासाठी महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग राज्य शासनाला शिफारस करणार आहे. नागरिकांचा राग आणि संताप आम्ही समजू शकतो. मात्र, आम्ही नागरिकांना शांततेचे आवाहन करत आहोत.
बाल हक्क संरक्षण आयोगाच्या वतीने प्रशासनाकडून माहिती घेण्यात येत आहे. तसेच योग्य त्या सूचना देखील देण्यात येत आहेत. आम्ही आयोगाच्या वतीने या बालिकेला व कुटुंबीयांना लवकरात लवकर न्याय मिळवून देण्यासाठी विशेष सरकारी वकील शासनाने नियुक्त करावा आणि हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात घेऊन लवकरात लवकर न्याय मिळवून देण्यासाठी शिफारस करणार आहोत, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
दरम्यान, पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात आज कडकडीत बंद पाळण्यात आलाय. नसरापूर येथे चिमुकलीवर झालेल्या लैंगिक अत्याचार आणि हत्येच्या निषेधार्थ भोर व राजगड तालुक्यात व्यापारी, दुकानदार आणि स्थानिक नागरिकांनी बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सर्व व्यापारी संघटनांनी बंदचे आवाहन केले होते. आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीसाठी हा बंद पाळण्यात आलाय.
आणखी वाचा
आणखी वाचा