Chennai Super Kings News: इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेत (IPL 2026) नुकतेच शनिवारी (२ मे) चेन्नई सुपर किंग्सने मुंबई इंडियन्सला ८ विकेट्सने पराभूत केले. चेपॉकला झालेल्या या सामन्यातून नाशिकच्या रामकृष्ण घोषने (Ramakrishna Ghosh) चेन्नईसाठी पदार्पण केले होते.
मात्र एकच सामना खेळल्यानंतर त्याला आयपीएल २०२६ स्पर्धेतून बाहेर व्हावं लागलं आहे. याबाबत चेन्नई सुपर किंग्सने माहिती दिली आहे.
IPL 2026 सुरू असतानाच बदलले राजस्थान रॉयल्सचे मालक! मित्तल अन् पुनावाला यांनी केली डिल, पण किती कोटी मोजले?रामकृष्ण घोषने या सामन्यात मुंबईचा सलमीवीर विल जॅक्सचा अफलातून झेल घेतला होता. त्यानंतर त्याने मुंबईचा अनुभवी फलंदाज सूर्यकुमार यादवला २१ धावांवर बाद करत आयपीएलमधील पहिली विकेट घेतली होती. मात्र आता तो दुखापतीमुळे आयपीएल २०२६ स्पर्धेतून बाहेर झाला आहे. चेन्नई सुपर किंग्सने (CSK) त्याला फ्रॅक्टर झाल्याची माहिती दिली आहे.
चेन्नईने दिलेल्या माहितीनुसार रामकृष्णला मुंबईविरुद्ध खेळताना उजव्या पावलाला फ्रॅक्चर (Foot Fracture) झाले आहे. त्यामुळे तो पुढील स्पर्धा खेळू शकणार नाही. दरम्यान, त्याला ही दुखापत कशामुळे झाली हे स्पष्ट करण्यात आलेले नाही.
दरम्यान, मुंबईविरुद्धच्या सामन्यानंतर चेन्नईचे मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी त्याला दुखापत झाल्याची माहिती दिली होती. त्याने गेल्या काही काळात प्रभावित केले होते. पण तो सामन्यात दुखापतग्रस्त झाल्याने निराशा झाल्याचे त्यांनी म्हटले होते.
महाराष्ट्रासाठी देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या रामकृष्णला २०२५ हंगामासाठी झालेल्या लिलावात चेन्नईने ३० लाखाला खरेदी केले होते. पण २०२५ मध्ये त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही. पण नुकतेच मुंबईविरुद्ध त्याला पदार्पणाची संधी मिळाली. मात्र आता दुखापतीमुळे त्याला या हंगामातून बाहेर जावे लागले आहे.
Ravi Shastri: CSK कडून हरल्यानंतर रवी शास्त्रींचा महास्फोट! मुंबई इंडियन्सने आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली; वाचा काय म्हणाले शास्त्रीदरम्यान, घोष हा आयपीएल २०२६ मधून बाहेर होणारा चेन्नईचा चौथा खेळाडू आहे. यापूर्वी नॅथन एलिस आणि खलील अहमद या वेगवान गोलंदाजांसह आयुष म्हात्रे हे खेळाडूही आयपीएलमधून बाहेर झाले आहेत. तसेच एमएस धोनीही अद्याप आयपीएल २०२६ मध्ये पुनरागमन करू शकलेला नाही. त्यामुळे चेन्नईला यंदा दुखापतींनी बरंच सातावलं आहे. तथापि, चेन्नईने अद्याप रामकृष्ण घोषच्या बदली खेळाडूची घोषणा केलेली नाही.
चेन्नई सुपर किंग्सने आयपीएल २०२६ स्पर्धेत आत्तापर्यंत ९ सामन्यांतील ४ सामन्यात विजय मिळवला आहे, तर ५ सामन्यांत पराभव स्वीकारला आहे. त्यामुळे सध्या चेन्नई सहाव्या क्रमांकावर असून त्यांचा पुढचा सामना दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध ५ मे रोजी दिल्लीमध्ये खेळवला जाणार आहे.