मुंबई : राज्यात उष्णतेमुळे नागरिक त्रस्त झाले असून ऊन्हापासून (Summer) बचावासाठी वेगवेगळे पर्याय अवलंबत आहेत. तसेच, भरदुपारी घराबाहेर जाणेही टाळले जात आहे. एकीकडे कडक उन्हामुळे अंगाची लाहीलाही होत असताना दुसरीकडे मराठवाडा आणि विदर्भात अवकाळी पावसाने (Rain) हजेरी लावली आहे. काही जिल्ह्यात जोरदार वाऱ्यासह गारांचा पाऊस पडल्याचंही दिसून आलं. जालना, गोंदिया, भंडारा, (Marathwada) गडचिरोली, नंदूरबार जिल्ह्यात अवकाळीमुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. तर, काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान झालंय.
जालना तालुक्यातील रामनगर परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावल्याने उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. जालना तालुक्यात आज अचानक काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. रामनगर कारखाना परिसरात दुपारी अचानक वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस बरसला. गेल्या काही दिवसांपासून जालना जिल्ह्यात तापमानाचा पारा वाढल्याने नागरिक उकाड्याने प्रचंड हैराण झाले होते. मात्र, या पावसाने परिसरातील हवेत गारवा निर्माण झाल्याने नागरिकांना उष्णतेपासून तात्पुरता दिलासा मिळाला.
गोंदिया जिल्ह्यात दुपारनंतर अनेक भागामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. तर काही ठिकाणी गारांचा देखील पाऊस झाला आहे. या पावसामुळे गोंदिया जिल्ह्यातील कापणीला आलेल्या धान पिकांना मोठा फटका बसला आहे. या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून असह्य उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला.
कडक उन्हाने हैराण झालेल्या गडचिरोलीकरांना आज अचानक दिलासा मिळाला. गडचिरोली शहरात सायंकाळी अचानक वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. दुपारपर्यंत कडक उन्हाने अंगाची लाही लाही होत असतानाच, सायंकाळच्या सुमारास गडचिरोली शहरात हवामानाने अचानक पलटी घेतली. वादळी वाऱ्यासह मुसळधार अवकाळी पावसाने शहराला झोडपून काढलं. अचानक आलेल्या या पावसामुळे नागरिकांची एकच धांदल उडाली. अनेकजण आडोशाला धावताना दिसले, तर काही ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून पडल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. या अवकाळी पावसामुळे उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला असला, तरी शेतकऱ्यांसमोर मात्र नव्या चिंतेचं संकट उभं राहिलं आहे. उन्हाळी पिकांना या पावसाचा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, हवामान खात्याकडून पुढील काही दिवस अशाच बदलत्या वातावरणाचा इशारा देण्यात आला असून नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
गेल्या काही दिवसांपासून कडक उन्हाळा आणि असह्य उकाड्यानं हैराण झालेल्या भंडारावासीयांना आज निसर्गानं काहीसा दिलासा दिला. तर दुसरीकडे बळीराजावर चिंतेचे ढग दाटले आहेत. जिल्ह्यात आज दुपारच्या सुमारास अचानक हवामानात बदल झाला आणि अनेक भागात वादळी वाऱ्यासह पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. विशेष म्हणजे, तुमसर तालुक्यातील आलेसुर येथे विजांच्या कडकडाटासह गारांचा जोरदार पाऊस पडला. एकीकडे सर्वसामान्यांना उकाड्यापासून दिलासा मिळाला असला, तरी हा पाऊस शेतकऱ्यांसाठी मात्र चिंताजनक ठरला आहे. वादळी वाऱ्यामुळे उभं असलेलं भातपीक जमिनीवर आडवं झालं आहे. तुमसर तालुक्यातील आलेसुर आणि परिसरातील गारपिटीमुळे भाताचे दाणे गळून पडण्याची भीती निर्माण झाली आहे.
अवकाळी पावसाने अचानक हजेरी लावून जनजीवन विस्कळीत केले. सध्या लग्नसराई सुरु असल्याने चंदगड, गडहिंग्लज, आजरा, सिंधुदुर्ग आणि गोव्यातून खरेदीसाठी आलेल्या लोकांची पंचाईत झाली. अनेक ठिकाणी झाडें विजेच्या तारावर कोसळल्यामुळे विद्युत पुरवठा खंडित झाला. गेल्या दोन दिवसापासून तापमानात वाढ होऊन उष्माही वाढला होता. आज सकाळपासून अनेक वेळा ढग अंधारून आले पण पाऊस आला नाही. सायंकाळी मात्र विजांचा अचानक गडगडाट सुरु होऊन सोसाट्याचा वारा वाहू लागला आणि पावसाला सुरुवात झाली. अद्याप पावसाळ्यापूर्वीचे गटारीचे साफसफाईचे काम झाले नसल्याने गटारीतील पाणी रस्त्यावरून वाहत होते. रस्त्यावर बसून भाजीपाला, फळे आणि अन्य वस्तूंची विक्री करणाऱ्या किरकोळ विक्रेत्यांची देखील सामान आवरताना तारांबळ उडाली. यावर्षी मे 14 रोजी लग्नाचा अखेरचा मुहूर्त असल्याने परगावातून लोक कपडे, भांडी, दागिने खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात येत आहेत. खरेदीसाठी आलेल्या लोकांना देखील खरेदी केलेले सामान भिजू नये म्हणून आसरा हुडकताना अनेकांची दमछाक झाली.